आमच्या लेखी संजय राऊत फार महत्त्वाचा माणूस नाही : देवेंद्र फडणवीस

मुंबई : संजय राऊत हे रोजच टीका करत असतात. आम्ही त्यांना फार महत्त्व देत नाही. आमच्या लेखी संजय राऊत हा फार महत्त्वाचा माणूस नाही, असे वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी ज्ञानवापी मशीद आणि राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा यावरून टीकेचा सूर लावला आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना गुरुवारी मुंबईत पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी संजय राऊत यांची दखल घेणेही टाळले. संजय राऊत यांच्याविषयीच्या प्रश्नांवर मी का उत्तरं देऊ? ते एवढे मोठे कोण लागून गेले आहेत, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. संजय राऊत हे दररोज उठून टीकाच करत असतात. त्यामुळे त्यांच्याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही, असे फडणवीस यांनी म्हटले.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांना ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादासंदर्भात प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, मला वाटते की, आम्ही यासंदर्भात राजकीय परिणामांचा विचार करत नाही. हा विषय आस्थेचा आहे. आस्थेचे विषय हे राजकारणापलीकडे असतात. न्यायालय हे विषय सोडवत आहे, ही गोष्ट महत्त्वाची आहे. आता न्यायालय काय निर्णय देते, ते पाहावे लागेल; पण औरंगजेबाने अशाप्रकारे मंदिरं तोडली होती, ही गोष्ट खरी आहे, असे फडणवीस यांनी म्हटले.

Share