औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काल झालेल्या पाडवा मेळाव्यात हिंदुत्वावरून बोलताना विरोधकांवर कडाडून टीका केली. तसेच मशीदीवरील भोंग्यावरूनही त्यांनी इशारा दिला. मशीदीवरील भोंगे उतरलेच पाहिजेत, नाही काढले तर मशीदीसमोर स्पिकर लाऊन हनुमान चालीसेचे पठन करा. असा आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिला. मात्र त्यानंतर यावरून जोरदार राजकारण पेटलं आहे.
शिवसेना आणि मनसेत आता धार्मिक विषयांवरून फेसबूक वॉर सुरू झालं आहे. शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी थेट राज ठाकरेंचा मुस्लिम वेशभूषेतला फोटो फेसबूकवर पोस्ट केला आहे. लोकांच्या समस्यांबाबत न बोलता राज ठाकरेंनी धर्मावर बोलून धार्मिक तेढ वाढवल्याचा आरोप दानवे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये केला आहे. दानवेंच्या या पोस्टला मनसे उत्तर देणार का? आणि यामुळे आणखी कशाप्रकारे राजकारण तापणार हे बघणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
अंबादास दानवेंची पोस्ट अशी…
कोरोना नंतर च्या काळात आज जनतेच्या पोटावर पोटतिडकीने बोलेल आणि त्या नुसार कृती करेल तो खरा लोकनेता….आज जात,धर्म,प्रांत भेद करण्याची ही वेळ नाही.लोकांची रोजी रोटी हिसकावून घेतली गेली आहे.व्यावसाय बुडाले आहे, नोकऱ्या जाऊन बेकारी वाढली आहे.महागाई चा आगडोंब भडकला आहे.केंद्राच्या दिवसेंदिवस दैनंदिन वस्तूच्या वाढत्या महागाईमुळे गोर गरिबांचा संसार विस्कटला आहे. यावर बोलायचे सोडून धार्मिक अराजक कसे माजेल यावर ते बोलले. शिवतीर्थावर झालेल्या गुडी पाडवा स्नेह संमेलनात स्नेह वाढण्या ऐवजी जाती धर्मात द्वेष वाढवण्याचे काम मनसेप्रमुखांनी केले आहे. ह्या त्यांच्या भाषणातून मनसैनिकाना आज काय मिळाले असेल ते केवळ नैराश्य आणि काळजी….राज ठाकरे यांनी केंद्राच्या लोकशाही विरुद्ध धोरणावर आसूड ओढले असते तर आपल्या कार्यकर्त्या कडून टाळ्यांचा कडकडाट झालेला बघायला मिळाला असता पण तसे दिसले नाही.
आणि शेवटी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे प्रचंड दूरदृष्टी असलेले नेते होते. याची जाणीव आज सबंध महाराष्ट्राला होतेय.