‘पी के’ नी फेटाळली कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची ऑफर

नवी दिल्ली : सुप्रसिद्ध निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास नकार दिला आहे. प्रदिर्घ चर्चा व विशेष समितीच्या अहवालानंतर काँग्रेस नेते रणदिप सुरजेवाला यांनी यासंबंधीची घोषणा केली आहे. ते म्हणाले -काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एका अधिकार प्राप्त कृती गटाची स्थापना करुन प्रशांत किशोर यांच्यापुढे पक्षात येण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण, त्यांनी तो फेटाळला. त्यांचे प्रयत्न व पक्षाला केलेल्या सूचनांचे आम्ही कौतुक करतो.

सोनिया गांधींनी प्रशांत यांचे सादरीकरण व त्यांच्या पक्षातील प्रवेशावर विचार करण्यासाठी काँग्रेस नेत्यांची समिती स्थापन केली होती. या समितीने आपला अहवाल सोनिया गांधींना सोपवला. त्यात किशोर यांच्यावर निर्णय घेण्यासाठी समितीचे सदस्य के.सी.वेणुगोपाल, दिग्विजय सिंह, अंबिका सोणी, रणदिप सुरजेवाला, जयराम रमेश व प्रियंका गांधी वढेरा  जनपथवर गेले होते.

या समितीने प्रशांत किशोर यांनी उर्वरित सर्वच राजकीय पक्षांपासून अंतर राखण्याचा व पूर्णवेळ काँग्रेससाठी काम करण्याचा आग्रह धरला होता. याऊलट किशोर यांनी काँग्रेसला ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस व केसीआर यांच्या टीआरएस सारख्या प्रादेशिक पक्षांसोबत काम करण्याचा सल्ला दिला होता.

प्रशांत किशोर यांनी काँग्रेसपुढे ६०० पाणांचे सादरीकरण सादर केले होते. त्यात पक्षाला पुन्हा सत्तेत परतण्यासाठी काय करावे लागेल याचा विस्तृत उहापोह करण्यात आला होता. पण, काँग्रेसच्या अनेक दिग्गजांनी त्यांच्यापासून अंतर राखल्यामुळे त्यांनी अखेर काँग्रेसपासून अंतर राखण्याचा निर्णय घेतला.

 

Share