उदयपूर : राजस्थानमधील उदयपूर येथे काँग्रेसच्या तीन दिवसीय नवसंकल्प चिंतन शिबिरास आज (१३ मे) पासून सुरुवात झाली. शिबिरात उद्घाटन सत्रात बोलताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्रातील सत्ताधारी मोदी सरकार आणि भाजपवर निशाणा साधला. भाजप देशवासियांना भीतीच्या वातावरणात जगण्यास भाग पाडत आहे. देशात भाजपकडून सूडाचे राजकारण केले जात आहे. धर्माच्या नावावर ध्रुवीकरण केले जात आहे. अल्पसंख्याकांना लक्ष्य केले जाते. त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत, असा आरोप सोनिया गांधींनी केला.
यावेळी सोनिया गांधी म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या ‘कमाल प्रशासन, किमान सरकार’ या घोषणेचा अर्थ देशाला सतत ध्रुवीकरणाच्या स्थितीत ठेवने तसेच लोकांना नेहमी भीती आणि असुरक्षित स्थितीत राहण्यास भाग पाडणे हा आहे. याशिवाय समाजाचा अविभाज्य भाग असलेल्या आणि समान नागरिक असलेल्या अल्पसंख्याकांना अत्याचारित आणि अनेकदा क्रूरपणे लक्ष्य करणे असाही अर्थ आहे. आज राजकीय प्रतिस्पर्ध्याची मुस्कटदाबी केली जात आहे. तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. इतिहास पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात पंडित जवाहरलाल नेहरू यांचे योगदान सुनियोजितपणे हद्दपार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे लोक महात्मा गांधींचा खून करणाऱ्या व्यक्तीचे गुनगाण केले जात असून, गांधींची शिकवण पुसून टाकत आहेत. देशाची प्राचीन संस्कृती नष्ट केली जात आहे. दलित, आदिवासी व महिलांत असुरक्षेचे वातावरण आहे. देशात भीतीदायक वातावरण तयार केले जात आहे.
नवसंकल्प चिंतन शिबिराच्या निमित्ताने भाजप, आरएसएस आणि त्यांच्या सहकाऱ्यांमुळे देशासमोर निर्माण झालेल्या अनेक आव्हानांवर चर्चा करण्याची संधी आपल्याला मिळत आहे. पक्षात बदल गरजेचा असल्याचे सांगून पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी सर्वच नेते व कार्यकर्त्यांना अंग झटकून कामाला लागण्याचे आवाहन सोनिया गांधी यांनी केले. पक्षाने आपल्याला खूप काही दिले. आता पक्षाचे उपकार ऋण फेडण्याची वेळ आली आहे, असे त्या म्हणाल्या.
काँग्रेस कामाचे मार्केटिंग करत नाही -अशोक गहलोत
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले, यूपीए सरकारच्या काळात लोक काय म्हणतील याचा विचार केला जात होत;. पण आज या लोकांनी धर्माच्या नावाने संपूर्ण देश ताब्यात घेतला आहे. धर्म, जातीच्या नावाने दंगली पेटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता राजस्थान त्यांच्या हिटलिस्टवर आहे. राज्यात केव्हाही दंगली, सीबीआय व ईडीची छापेमारी सुरू होते.
देशाने मागील ७० वर्षांत खूप प्रगती केली. काँग्रेसचे सिद्धांत, धोरण देशाच्या डीएनए सारखी आहेत. त्यानंतरही ते निर्लज्जपणे काँग्रेसने ७० वर्षांत काय केले असा प्रश्न करतात. आम्ही काम करतो;पण आम्ही मार्केटिंग करत नाही. हा आमचा कच्चा दुआ आहे. याउलट हे खोटारडे लोक काम कमी व मार्केटिंग जास्त करतात. कधी गुजरात मॉडेलची गोष्ट करतात, अशी टीका त्यांनी भाजपवर केली.
राहुल गांधी, प्रियंका गांधी, सचिन पायलट, अजय माकन यांच्यासह काँग्रेस पक्षाचे अनेक दिग्गज नेते या शिबिरास उपस्थित आहेत. हे चिंतन शिबीर १३, १४ आणि १५ मे असे तीन दिवस चालणार आहे. एका परिवारातील एकाच सदस्याला निवडणुकीचे तिकीट देण्याबाबत पक्षाने घेतलेल्या निर्णयावर या शिबिरात शिक्कामोर्तब होणार आहे. तसेच राजकारण, अर्थव्यवस्था, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण, पक्ष संघटना, शेतकरी आणि कृषी क्षेत्र तसेच तरुणांशी संबंधित विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.