आजपासून निर्बंधमुक्त महाराष्ट्र; मास्क सक्तीही नाही

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यामुळे यावेळी गुढी पाढवा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि रमजान उत्सव हा साजरा करण्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही. निर्बंध हटवल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायदाही मागे घेण्यात येणार आहे. त्यामुळे मास्कचा वापर न केल्यास होणारी दंड आकारणीही रद्द होणार आहे. दरम्यान, ज्यांना मास्कचा वापर करायचा आहे त्यांनी करावा, नसेल त्यांनी नको, मास्कचा वापर हा ऐच्छिक असणार आहे.

मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, औरंगाबादसह मोठ्या शहरात हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट अशा ठिकाणी निर्बंध होते. ते बंद करण्यासाठीही वेळेची मर्यादा होती. पण महाराष्ट्र राज्य सरकारनं कोरोना निर्बंध हटवण्याचा निर्णय कॅबिनेट बैठकीत घेतल्यामुळे रेग्युलर वेळेनुसार बार बंद होतील.  येत्या १ एप्रिल ते ८ एप्रिलपर्यंत राज्य सरकारने संचारबंदी लागू केली होती. या पार्श्वभूमीवर गुढीपाडवा, रामनवनी हे सण कसे साजरे करायचे? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला होता. विरोधकांनी यासंदर्भात राज्य सरकारवर सातत्याने टीका केली होती. यानंतर आता राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर हे सण धूमधडाक्यात साजरे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. २ एप्रिल अर्थात गुढीपाडव्यापासून हे निर्बंध उठवण्यात आले आहेत.

 

Share