मुख्यमंत्र्यांच्या सभेची तयारी जोरात, खैरे, दानवेंच्या हस्ते स्तंभपुजन

औरंगाबाद : मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची औरंगाबादच्या मराठवाडा संस्कृतीक मंडळावर ८ जून रोजी सभा होणार आहे. या सभेची जोरदार तयारी औरंगाबादेतील शिवसेनेचे पदाधिकारी आणि नेते करीत आहे. आज सकाळी सभास्थळावर शिवसेनेच्या वतीने स्तंभपूजन करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, आमदार प्रदीप जैस्वाल यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

याच मैदानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विराट सभा घेतली होती. आता याच ठिकाणी उद्धव ठाकरे देखील जाहीर सभा घेणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमधील सभा ऐतिहासिक होईल, असा दावा शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे. यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेचे पदाधिकारी कामाला लागले आहेत.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, औरंगाबादेत ८ जून १९८५ रोजी शिवसेनेची पहिली शाखा स्थापन झाली. या शाखेच्या ३७ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी लाखो शिवसैनिक उपस्थित असतील. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, सभेच्या तयारीला आम्ही सुरुवात केली असून विधीवत पूजा करण्यात आली. आम्ही हिंदू आहोत, त्यामुळे शास्त्र नियमानुसार काम करतो, असंही खैरेनी आवर्जून सांगितलं. तसेच उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या नियोजनासाठी बैठका सुरु असून सर्व आमदार-पदाधिकारीही या कामात आहेत.

नामांतर होणार? उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष…

मागच्या महिन्यात याच मैदानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत त्यांनी मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन चांगलेच राजकारण तापवले होते. त्याचे पडसाद अनेक दिवस राज्यभर पडताना आपल्याला दिसले. आता या मुद्द्यावर उद्धव ठाकरे काही बोलणार का ?, औरंगाबादच्या पाणीप्रश्नावरुन विरोधकांनी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. यावर ठाकरे काय बोलणार?, याच मैदानावर बोलताना हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे याबाबत काही मोठी घोषणा करणार का? याकडेही सध्या सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.

Share