पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जूनला देहूत; संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे होणार लोकार्पण

पुणे : श्रीक्षेत्र देहू येथील जगद्गुरु, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी १४ जूनला पंतप्रधान मोदी देहूत येणार आहेत.

काही दिवसांपूर्वीच देहू संस्थानाच्या विश्वस्तांसह भारतीय जनता पक्षाचे आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना या कार्यक्रमाचे आमंत्रण दिले होते. पंतप्रधान मोदी यांनी हे आमंत्रण स्वीकारले आहे. येत्या १४ जूनला हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

आचार्य तुषार भोसले यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘महाराष्ट्र आणि वारकरी संप्रदायासाठी ऐतिहासिक क्षण. इतिहासात पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान श्रीक्षेत्र देहू येथे येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १४ जून रोजी जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण करणार आहेत.’

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कार्यक्रमाच्या निमित्ताने देहूनगरीत पहिल्यांदाच दाखल होणार आहेत. यामुळे या कार्यक्रमाची देहू संस्थानकडून जय्यत तयारी सुरू आहे. देहू संस्थानकडून याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला असून लवकरच याबाबत पत्रक काढणार असल्याचे संस्थानकडून सांगण्यात आले आहे.

Share