गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांनी आज १०० व्या वर्षामध्ये पदार्पण केले. हिराबेन यांच्या वाढदिवसानिमित्त मोदींनी आज गांधीनगरमध्ये जाऊन आईची भेट घेतली. यावेळी त्यांनी आईचे आशीर्वाद घेतले. मोदींनी आईची भेट घेतल्याचे फोटो ट्विटरवरून पोस्ट केले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी पोस्ट केलेल्या काही फोटोंमध्ये ते आईचे पाय धुताना दिसत आहेत.
“आज मी आईचे आशीर्वाद घेतले. आज ती १०० व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे,” अशी कॅप्शन मोदींनी या फोटोंना दिली आहे. या कॅप्शनसोबत शेअर केलेल्या फोटोंमध्ये पंतप्रधान मोदी हे हिराबेन आसनस्थ झालेल्या खुर्चीच्या जवळ बसलेले दिसत असून, ते आईशी हसून चर्चा करत आहेत. एका फोटोत आई त्यांना गोड पदार्थ खावू घालताना दिसतेय, तर अन्य एका फोटोमध्ये मोदी आईचा आशीर्वाद घेताना दिसत आहेत.
Took blessings of my mother today as she enters her 100th year… pic.twitter.com/lTEVGcyzdX
— Narendra Modi (@narendramodi) June 18, 2022
पंतप्रधान मोदींनी शेअर केलेले हे फोटो अल्पावधीत व्हायरल झाले आहेत. हे फोटो पोस्ट केल्यानंतर काही मिनिटांमध्ये त्यांना सव्वापाच हजारांहून अधिक वेळा रिट्विट करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर याच वर्षी मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आईची भेट घेतली होती. यापूर्वी ११ मार्च रोजी पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असताना अहमदाबादमध्ये त्यांनी आईची भेट घेतली होती. रात्री नऊच्या सुमारास पंतप्रधान मोदी आपली सर्व कामे संपवून घरी गेले. त्यावेळी मोदी यांनी आपल्या आईचे आशीर्वाद घेतले आणि त्यांच्यासोबत जेवणही केले होते.
कोरोना प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे पंतप्रधान मोदी त्यांच्या आईला भेटले नव्हते. मार्च महिन्यातील ही भेट दोन वर्षांमधील पहिलीच भेट ठरली. हिराबेन मोदी यांना ‘हिराबा’ या नावानेही अनेकजण ओळखतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू पंकज मोदी गांधीनगरजवळच्या रायसन भागात राहतात. मोदी यांच्या आई हिराबेन या सध्या इथेच राहत आहेत. हिराबेन मोदी यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त आज शनिवारी पंतप्रधान मोदी यांनी आई हिराबा यांचे पाय धुतले आणि पुष्पहार घालून त्यांच्या चरणांना स्पर्श करत आईचे आशीर्वाद घेतले.
आईच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी वडनगर येथील हटकेश्वर मंदिरात पूजा करणार आहेत. हिराबेन मोदी यांच्या गौरवार्थ गांधीनगर येथील एका रस्त्याला त्यांचे नाव देण्यात येणार असून, या कार्यक्रमास पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी आज वडोदरा येथे गुजरात गौरव अभियानात सहभागी होणार असून, यावेळी २१ हजार कोटींपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे.