नाशिक : बँकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करून परदेशात पलायन केलेल्या मेहुल चोक्सीची बेनामी मालमत्ता नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी भागात सापडली आहे. मुंढेगावच्या बळवंतवाडीतील ही मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आयकर विभागाने केलेल्या या कारवाईत ९ एकर २२ गुंठे क्षेत्रातील ही मालमत्ता जप्त केली आहे. घोटाळ्याच्या पैशातून चोक्सीने ही मालमत्ता घेतल्याची माहिती समोर येत आहे.
मेहुल चोक्सी हा हजारो कोटींच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी असून, त्याला पकडण्यासाठी रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली आहे. आयकर विभागाकडून जप्त करण्यात आलेली मेहुल चोक्सीची ही मालमत्ता नाशिक-मुंबईमार्गे जाणारा उत्तर भारताकडे जो रेल्वेमार्ग आहे त्याच्या अगदी समोरच्या बाजूला आहे. बळवंतवाडीच्या शिवारात मुंबई-नाशिक, मुंबई-आग्रा या दोन्ही महामार्गालगत चोक्सीची ही जागा आहे. सुमारे १५ वर्षापूर्वी ही जागा विकत घेण्यात आल्याचे समजते. काही स्थानिकांच्या नावाने ही मालमत्ता खरेदी करण्यात आली होती, अशी माहिती समोर येत आहे. ‘एसईझेड’च्या नावाखाली येथे कंपनी येणार आहे, असे सांगून येथील स्थानिक शेतकऱ्यांकडून ही जमीन खरेदी करण्यात आली होती. साधारण १५ वर्षांपूर्वी या ठिकाणी मुंबईचे काही लोक येथे आले होते आणि त्यांनी या ठिकाणचा नकाशा नेला होता तसेच येथे कंपनी येणार असल्याचे सांगितले होते, अशी माहिती येथील एका शेतकऱ्याने दिली आहे.