गुजरात निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरू

नवी दिल्ली : गुजरात विधानसभेची निवडणूक चालू वर्षाच्या अखेरीस होणार असली तरी आतापासूनच भाजपने या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी दर महिन्याला गुजरातचा दौरा करणार असल्याची माहिती भाजप सूत्रांनी शुक्रवारी दिली. येत्या १८ एप्रिलपासून पंतप्रधान मोदी तीन दिवस गुजरात दौर्‍यावर जात आहेत. हा त्यांच्या निवडणूक प्रचार तयारीचा भाग मानला जात आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याच्या कितीतरी आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या राज्याचे झंझावाती दौरे केले होते. पूर्वांचल एक्सप्रेसवे उद्घाटन असो वा अलिगड विद्यापीठाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन असे अनेक कार्यक्रम त्यांनी केले होते. त्याच धर्तीवर आता मोदी यांनी गुजरातसाठी योजना आखल्याचे मानले जात आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवला होता. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशचा निकाल जाहीर झाल्याच्या दुसर्‍याच दिवशी मोदी यांनी ११ मार्चला गुजरातला भेट देऊन अहमदाबादमध्ये विजयी रॅली काढली होती. आता गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पंतप्रधानांच्या वारंवारच्या दौर्‍यांमुळे राज्यातील भाजप कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण होईल, असे पक्षाचे म्हणणे आहे. १८ तारखेपासून सुरू होणार्‍या दौर्‍यादरम्यान मोदी आदिवासी बहुल दाहोदचा दौरा करणार आहेत. याशिवाय शेती आणि दुग्ध उत्पादनासाठी प्रसिध्द असलेल्या बनासकांठालाही ते भेट देणार आहेत. याठिकाणी अनेक डेअरी प्रकल्पांचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. महिला दूध उत्पादक तसेच शेतकर्‍यांशीही ते संवाद साधणार आहेत.

Share