नंदुरबार : राज्यातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी महाराष्ट्र शासन कटीबद्ध असून त्यांच्या उन्नतीकरिता आदिवासी विकास विभागासाठी ११ हजार १९९ कोटींची तरतूद सन २०२२-२०२३ मध्ये केली आहे. असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नंदुरबार येथे केले. छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदीरात शिंदे बोलत होते.नंदुरबार नगर परिषदेच्या नुतन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा शिंदे यांच्या हस्ते पार पडला.
या कार्यक्रमाला आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत,पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, कृषि मंत्री अब्दुल सत्तार,बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादाजी भूसे,खासदार डॉ.हिना गावीत,खासदार राजेंद्र गावीत,आमदार किशोर दराडे,आमदार किशोर पाटील,आमदार मंजुळाताई गावीत,आमदार राजेश पाडवी,आमदार शिरीष नाईक,आमदार चिमणराव पाटील उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,राज्यातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटीबद्ध आहे.आदिवासी समाजासाठी अर्थसंकल्पात भरघोस निधीची तरतूद केली आहे.राज्यातील विकास कामांना गती व चालना देण्याचे काम हे सरकार करीत आहे. हे सरकार आदिवासी,शेतकरी,कष्टकरी,कामगार,वंचित-शोषित अशा सगळ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे. सर्व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी गत ४ महिन्यात ४०० पेक्षा अधिक शासन निर्णय काढले आहेत.
नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा असल्याने त्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी बोलताना दिली. आदिवासींच्या विविध विकास योजनांच्या अंमलबजावणीकरिता ११ हजार १९९ कोटींची तरतूद केली असल्याचे यासमयी स्पष्ट केले.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 29, 2022
राज्यातील तरुणांना रोजगार देण्यासाठी राज्यात मोठे उद्योगधंदे येण्याकरिता शासन प्रयत्नशील आहे.नंदुरबार शहरातील रस्ते,पथदिवे,पाणीपुरवठा तसेच विविध विकासकामांसाठी नगरोत्थान योजनेतून निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच नवापूर मधील १३२ के.व्ही विद्युत उपकेंद्रासाठी एमआयडीसीमध्ये जागा उपलब्ध करुन देण्यात येईल. नंदुरबार नगर परिषदेची नूतन इमारत अतिशय सुंदर आणि सुसज्ज असून नागरिकांना त्याचा लाभ होईल, असा विश्वास यावेळी शिंदे यांनी व्यक्त केला.
शिंदे पुढे म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत एसटी बस प्रवासाची योजना सुरू केली.५२ दिवसांमध्ये या योजनेचा एक कोटींहू अधिक ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला. दिवाळीसाठी शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’केवळ १०० रुपयात देण्यात आला असून अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना अधिकाधिक मदत मिळावी या करिता नुकसानीची मर्यादा ३ हेक्टरपर्यंत वाढविण्यात आली आहे.नुकसान भरपाईपोटी जवळपास ३० लाख शेतकऱ्यांना ६ हजार कोटींची मदत देण्यात आली आहे.
नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेऊन एकाच वेळी सुमारे सात लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २५०० कोटी रुपये जमा केले असून लघुसिंचन योजनेच्या वीज बिलात प्रति युनिट एक रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांचा सेंद्रीय शेतीकडे कल वाढवा म्हणून त्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नंदुरबार नगर परिषदेची थकीत ७ कोटी २८ लाख रुपयांचा निधी त्वरीत मंजूर करुन नंदुरबारवासियांना विशेष भेट दिली.नंदुरबार नगरपरिषदेमार्फत प्रत्येक नागरिकांचा अपघात विमा काढण्यात आला असून अपघातग्रस्त ३ लाभार्थ्यांना यावेळी प्रत्येकी १ लाख रुपयांचा धनादेश वितरीत करण्यात आला.