अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर

मुंबई : केंद्रीय  निवडणूक आयोगाने ‘१६६ – अंधेरी पूर्व विधानसभा’ मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर केली आहे. या पोटनिवडणुसाठी २ नोव्हेंबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने जारी करण्यात आलेल्या अधिसुचनेनुसार अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी म्हणजे दि. ३ नोव्हेंबर २०२२ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

ही सार्वजनिक सुट्टी ‘१६६ – अंधेरी पूर्व ‘ या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी अंधेरी मतदार संघांच्या बाहेर असतील, त्यांना देखील लागू असल्याचे आदेशित करण्यात आले आहे. तसेच केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजिक उपक्रम, बॅंका इत्यादींना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील. या पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून अंधेरी पूर्व भागातील जागरूक नागरिकांनी या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी यानिमित्ताने केले आहे.

ठाकरे विरुद्ध भाजप रंगणार सामना
पोटनिवडणूकीत भाजपकडून मुरजी पटेल यांना तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटाने या निवडणुकीत भाजपाला पाठिंबा दिल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.

राज्यातील सत्तासंघर्षानंतर विधानसभेची ही पहिलीच निवडणूक असल्याने या निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारतं याकडेचं सर्वांचंच लक्ष लागून आहे. निवडणुकीत आपल्याच उमेदवाराचा विजय होईल असा दावा दोन्ही गटाच्या नेत्यांकडून केला जात आहे.

Share