चंदीगड : काँग्रेस नेते आणि पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची पंजाबमधील मानसा जिल्ह्यात अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना आज रविवारी घडली आहे. पंजाबमधील आम आदमी पार्टीच्या सरकारने एक दिवस आधीच सिद्धू मुसेवाला यांची सुरक्षा काढून घेतली होती. सरकारने सुरक्षा हटवल्याच्या दुसऱ्याच दिवशी सिद्धू मुसेवाला यांची हत्या करण्यात आली आहे.
शनिवारी पंजाबमधील भगवंत मान सरकारने सिद्धू मूसेवाला यांच्यासह एकूण ४२४ महत्त्वाच्या (व्हीआयपी) व्यक्तींची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ज्येष्ठ नेते चरणजीत सिंह ढिल्लो, बाबा लाखा सिंह, अकाली दलाचे नेते गनीव कौर मजीठिया, काँग्रेस नेते परगत सिंह, आप आमदार मदन लाल बग्गा यांची सुरक्षा काढून घेण्यात आली होती. आप सरकारने हा निर्णय घेण्याआधी व्हीआयपी नेत्यांच्या सुरक्षेसंदर्भात एक आढावा बैठक घेतली होती. त्यानंतर व्हीआयपी नेत्यांच्या सुरक्षेबाबत निर्णय घेण्यात आला.
Punjabi singer Sidhu Moose Wala was shot by unknown people in Mansa district, Punjab. Further details awaited. pic.twitter.com/DiK5s6UCvv
— ANI (@ANI) May 29, 2022
मिळालेल्या माहितीनुसार, गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसेवाला आपल्या मित्रांसोबत मानसा येथे त्यांच्या घरी जात होते. यावेळी प्रवासादरम्यान त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. अज्ञातांनी केलेल्या या हल्ल्यात त्यांच्या मृत्यू झाला असून या हल्ल्यात त्यांचे दोन मित्र जखमी झाले आहेत. सिद्धू मुसेवाला हे पंजाबमधील प्रसिद्ध गायक होते. मुसावाला यांनी मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये काँग्रेसमध्ये प्रवास केला होता. त्यांनी २०२२ साली काँग्रेसच्या तिकिटावर मानसा मतदारसंघातून पंजाब विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत आम आदमी पक्षाचे डॉ. विजय सिंगला यांनी मुसेवाला यांचा ६३ हजार ३२३ मतांच्या फरकांनी पराभव केला होता. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी नुकतेच विजय सिंगला यांची भ्रष्टाचाराच्या आरोपावरून हकालपट्टी केली होती.
गेल्या महिन्यात सिद्धू मुसेवाला यांनी त्यांच्या ‘बली का करा’ या गाण्यात आम आदमी पार्टी आणि त्यांच्या समर्थकांना लक्ष्य केल्याने वाद निर्माण झाला होता. गायकाने आपल्या गाण्यात आप समर्थकांना ‘गद्दार’ (देशद्रोही) म्हटले होते. दरम्यान, सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर काँग्रेसचे नेते रोष व्यक्त करत आहेत. तसेच भाजपनेदेखील पंजाबमधील आप सरकारवर टीका केली आहे.