नेपाळमध्ये बेपत्ता झालेल्या विमानाचे अवशेष सापडले; विमान ‘क्रॅश’ झाल्याची माहिती

काठमांडू : नेपाळमधील पोखरा येथून २२ प्रवाशांना घेऊन जोमसोम येथे जाणारे ‘तारा एअर’ कंपनीचे विमान आज रविवारी सकाळी बेपत्ता झाले होते. अखेर या बेपत्ता विमानाचा शोध लागला आहे. हे विमान ‘क्रॅश’ झाले असून, हिमालयातील मानापाथीच्या खालच्या भागात हे विमान दिसल्याची माहिती नेपाळ लष्कराने दिली आहे. त्याचवेळी मुस्तांगच्या कोबानमध्ये विमानाचे अवशेष सापडल्याची माहिती समोर येत आहे.

या विमानात चार भारतीयांसह २२ जण होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘तारा एअर’च्या ९ एनएईटी ट्विन-इंजिन असलेल्या या विमानाने रविवारी सकाळी ९ वाजून ५५ मिनिटांनी उड्डाण घेतले होते. या विमानाचे वैमानिक कॅप्टन प्रभाकर घिमेरे हे आहेत. या विमानातून अशोक कुमार त्रिपाठी, धनुष त्रिपाठी, ऋतिका त्रिपाठी व वैभवी हे चार भारतीय प्रवास करत होते. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हे विमान रडारवरून गायब झाले. या विमानाने पोखरा येथून सकाळी ९.५५ वाजता उड्डाण केल्यानंतर १५ मिनिटांनी कंट्रोल टॉवरशी विमानाचा संपर्क तुटला, असे एअरलाइनच्या प्रवक्त्याने सांगितले. अपघातग्रस्त विमान ३० वर्षे जुने असल्याचेही सांगितले जात आहे. अपघातग्रस्त विमान नंतर कोवांग गावात सापडले. मात्र, विमानातील प्रवासी सुरक्षित आहेत की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराच्या अधिकाऱ्यांना दूरवरून धूर निघताना दिसला. त्यानंतर या बेपत्ता विमानाचा शोध लागला.

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुस्तांगमधील कोबानजवळ विमानाचे अवशेष सापडले आहेत. नेपाळी लष्कराचे प्रवक्ते नारायण सिलवाल यांनी सांगितले की, नेपाळी लष्कराच्या एमआय-१७ हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात येत आहे. मात्र, खराब हवामानामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘तारा एअर’चे विमान लामचे नदीच्या मुखाजवळ मानपाथी हिमालयाच्या खालच्या भागात कोसळले. नेपाळ लष्कर हे रस्ता मार्ग आणि हवाई मार्गाने घटनास्थळाकडे जात आहे, असे लष्कराचे प्रवक्ते नारायण सिलवाल यांनी सांगितले, अशी माहिती ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिली आहे.

Share