औरंगाबादेत तोतया डीवायएसपीचा राडा; पोलिसांनी केली अटक

औरंगाबाद : शहरातील आकाशवाणी ते निराला बाजार रोडवरील कॅफेत जाऊन तेथील कॅफे चालकाला आणि ग्राहकांना आपण या शहराचा नवीन डीवायएसपी असल्याच सांगत धमकाविणाऱ्या तोतया डीवायएसपीला आणि त्याच्या दोन मित्रांना जिन्सी पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली आहे. संकेत जाधव, दिनेश गर्दी व ऋषिकेश गव्हाणे असे या तिन्ही आरोपींचे नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वतःला डीवायएसपी म्हणवून घेणारा संकेत जाधव हा पुण्यातील एका कंपनीत काम करत असून सध्या तो मिटमिटा भागात राहतो. बुधवारी रात्री ११ वाजेदरम्यान संकेत त्याच्या दोन मित्रांना सोबत घेऊन हातात फायबरचा दांडा घेत आकाशवाणी ते निराला बाजार रोडवरील वेगवेगळ्या कॅफे आणि रेस्टोरेंटमध्ये जाऊन तिथल्या चालकाला, ‘कॅफे, रेस्टोरेंट बंद करा, अन्यथा कारवाई करु’ तसेच तिथल्या तरुणीना ‘इतक्या रात्री बाहेर का फिरताय’ असे म्हणून धमकावु लागला. तेव्हा तिथल्या एका तरुणीने तिच्या भावाला फोन करून सर्व प्रकार सांगितला. सदर तरुणीचा भाऊ मित्रांसह रेस्टोरंटमध्ये दाखल झाला. त्यावेळी तोतया डीवायएसपीचा धिंगाणा सुरु होता. तरुणीच्या भावाने प्रश्न विचारायला सुरुवात केली. तेव्हा आपलं बिंग फुटणार अशी कल्पना आल्यावर त्याने लगेच तेथून पळ काढला. यादरम्यान हॉटेल मालकाने याची माहिती जिन्सी पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ याचा शोध लावत या तोतया डीवायएसपीला आणि त्याच्या मित्रांना अटक केली.

Share