उद्योगपती राहुल बजाज अनंतात विलीन; पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पुणे- देशातील ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांच काल पुण्यात निधन झालं.  त्यांच्या निधनाने महाराष्ट्रासह देशातल्या अनेक प्रतिष्ठित व्यक्ती, नेतेमंडळी तसेच सर्वसामान्यांनीही दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्यावर आज पुण्यातल्या वैंकुठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात  अंत्यसंस्कार  करण्यात आले.

राहुल बजाज यांचे पार्थिव त्यांच्या पिंपरी-चिंचवड येथील निवासस्थानी आणण्यात आले होते . यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि बजाज यांचे मित्र शरद पवार देखील उपस्थित होते. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पुणे दौऱ्यावर आले असता त्यांनीही बजाज यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले . बजाज यांच्या पार्थिवाचे कामगारांनी देखील अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग उपस्थित होता.  तसेच पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौर माई ढोरे यांनी देखील अंत्यदर्शन घेतलं. छगन भुजबळ, रघुनाथ माशेलकर, दिलीप वळसे पाटील आदींनी राहुल बजाज यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. तर अंत्यसंस्कारासाठी खासदार सुप्रिया सुळे आणि बाबा रामदेव हे देखील उपस्थित होते.

कामगारांनी व्यक्त केल्या भावना-

राहुल बजाज हे आमच्यासाठी देव होते. त्यांनी आम्हाला जगण्याची नवी उमेद दिली. त्यांनी लाखो कुटुंबे उभी केली आहेत. असे म्हणत कामगार भावनिक झाले तर काही जणांना अश्रू अनावर झाले होते. राहुल बजाज यांच्या जाण्याने कामगारांवर शोककळा पसरली आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून कामगार त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आले होते .

Share