राहुल गांधींचा संजय राऊतांना फोन; म्हणाले…

मुंबई : काॅँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेने काल महाराष्ट्राचा निरोप घेतला.त्यानंतर राहुल गांधी गुजरात निवडणुकीच्या प्रचारासाठी रवाना झाले आहेत. त्यापूर्वी त्यांनी काल रात्री ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली असल्याची माहिती स्वत: संजय राऊत यांनी ट्वीट करून दिली आहे.

संजय राऊत आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात की, भारत जोडोत व्यस्त असुनही राहुल यांनी रात्री फोन करुन माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. आम्हाला तुमची चिंता होती, असे म्हणाले. राजकारणातील सहकाऱ्यास खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात ११० दिवस यातना दिल्या याचे दु:ख वाटणे हीच माणुसकी आहे. हा ओलावा संपला आहे.यात्रेत तो दिसतोय..असे टि्वट राऊतांनी केलं आहे.

दरम्यान, आज सकाळी माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, राहुल गांधींसोबत माझं काल बोलणं झालं. त्यांनी माझी चौकशी केली. मी जेलमध्ये असताना किती जण आले? माझ्या कुटुंबियांसोबत उभे राहिले? राज्यातल्या प्रत्येक पक्षात माझे जुने सहकारी आहेत, पण किती आले? राजकीय मतभेद असले तरी अशावेळी गांधी कुटुंबियांनी माझी चौकशी केली. आज राहुल गांधी देशभरात फिरतायत, त्यांच्यात साहेबपणा नाहीये.

Share