कोश्यारीजी, माफी मागा..नाहीतर स्वत: लाच जोडे मारा..

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज  यांच्याबाबत केलेल्या विधानावर शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सडकून टिका केली आहे.

‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे की, वीर सावरकर यांचा राहुल गांधी यांच्याकडून ‘माफीवीर’ असा उल्लेख झाला. महाराष्ट्रात पोहोचलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेतील एका पत्रकार परिषदेत श्री. गांधी यांनी सावरकरांच्या दया याचिकेची कागदपत्रे दाखवून वादळ ओढवून घेतले तेव्हा महाराष्ट्रातील भाजप व त्यांच्या सोबतचा मिंधे गट स्वाभिमान, अपमान वगैरेंच्या नावाने वळवळू लागला, त्यातले काही वळू रस्त्यावर उतरले. त्यांनी “शिवसेना आता काय करणार?” असे विचारून राहुल गांधी यांना जोडे मारण्याचा उपक्रम सुरू केला. आता हे सर्व जोडे स्वत:च्याच हाताने स्वत:च्याच कानाखाली मारण्याची वेळ या जोडेबाजांवर आली असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

महाराष्ट्राच्या अस्मितेवर व स्वाभिमानावर पाय
‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा माती खाल्ली व शिवरायांचा अपमान केला. मराठवाडा विद्यापीठातील एका राजकीय सोहळ्यात राज्यपालांनी शिवरायांची तुलना नितीन गडकरी यांच्याशी केली. हा विषय तूर्त बाजूला ठेवू, पण शिवाजी महाराज हे जुनेपुराणे, कालबाह्य झाले आहेत, छत्रपती हे जुन्या जमान्यातील ‘हिरो’ आहेत, असे विधान करून महाराष्ट्राच्या अस्मितेतवर व स्वाभिमानावर पाय ठेवला. हे भयंकरच आहे’, असं सामनातून म्हटलं आहे.

महाराष्ट्रात वीर सावरकरांच्या अवमानाचा मुद्दा गाजत असतानाच भाजप व मिंधे गटाचा पाय त्यांच्याच राज्यपालांच्या धोतरात अडकून कपाळमोक्ष झाला आहे. राज्यपालांनी शिवरायांचा अपमान केला त्याच वेळी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांची ‘माफीवीर’ म्हणून टवाळी केली. शिवाजी महाराजांनी औरंगजेबास पाच माफीची पत्रे पाठविल्याचा भलताच इतिहास उकरून काढला व महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर हल्ला केला. वीर सावरकरांचा बचाव करताना त्यांनी शिवरायांना माफीवीर म्हणून देशातील समस्त शिवराय भक्तांच्या अस्मितेचा पाचोळा करून टाकला, असा घाणाघात शिवसेनेने केला आहे.

हे कोणत्या जन्माचे पाप महाराष्ट्राच्या बोकांडी बसवले?
राज्यपाल कोश्यारींनी थेट शिवाजी महाराजांची चेष्टा आणि टवाळी करण्याचे धारिष्ट्य दाखवले. हे बळ त्यांच्यात आले ते महाराष्ट्रात एक मिंधे आणि बेकायदेशीर सरकारला याच राज्यपालांनी सत्तेवर बसवल्यामुळेच. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होऊनही राज्याचे मुखअयमंत्री आणि उपमुख्यमंत्री तोंडातून निषेधाचा साधा ब्र काढायला तयारी नाहीत. शिवरायांचे विचार व मार्गदर्शन कालबाह्य झाले आहे, असे भाजपचे लोक उघडपणे बोलतात व असे बोलणारे राज्यपाल महाराष्ट्राला लाभतात हे कोणत्या जन्माचे पाप महाराष्ट्राच्या बोकांडी बसवले आहे?, असा रोखठोक सवाल शिवसेनेने केला आहे.

राज्यपालांनी शिवरायांबाबत जे घाणेरडे विधान केले ते त्यांचे वैयक्तिक मत आहे, असे भाजप आमदार संजय कुटे यांनी जाहीर केले. पण घटनात्मक पदावर बसलेली व्यक्ती व्यक्तिगत मते व्यक्त करू शकत नाही. ती मते राज्याची व राष्ट्राची असतात हेत्या कुटेंना कोणीतरी सांगायला हवे. स्वतःच्या अंगलट आले की वैयक्तिक मते. मग राहुल गांधींची मतेही वैयक्तिक ठरवा, असे म्हणत शिवसेनेने प्रत्युत्तर दिले आहे.

Share