मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना परळी कोर्टाने समन्स बजावले आहे. २२ ऑक्टोबर २००८ रोजी राज ठाकरे यांना अटक झाली होती. त्याच्या निषेधार्थ मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी परळी-गंगाखेड रोडवरील धर्मापुरी फाटा येथे एसटी महामंडळाच्या बसवर दगडफेक केली होती. या प्रकरणात आता राज ठाकरे यांना हे समन्स बजावण्यात आलं आहे.
दरम्यान राज ठाकरे व मनसे कार्यकर्ते न्यायालयात तारखेला गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध गेल्या वर्षी अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले हाेते. त्यानंतर मनसेचे तत्कालीन पदाधिकारी संजय अघाव, प्रल्हाद सुरवसे, अनीस बेग, शिवदास बिडगर, राम लटपटे या पाच जणांनी न्यायालयात हजर हाेऊन अजामीनपात्र वॉरंट रद्द केले. त्यानंतरही राज ठाकरे यांच्याविरुद्ध (१३ एप्रिल) दुसऱ्यांदा अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते.
कोर्टात काय आहे प्रकरण ?
२००८ मध्ये राज ठाकरे यांना एका प्रकरणात मुंबई येथे अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर त्याचे पडसाद परळीत उमटले. परळी – धर्मापुरी पॉईंटवर कार्यकर्त्यांकडून दगडफेकीत बसचे नुकसान झाले होते. या प्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यावर व चिथावणीखोर विधानाबद्दल राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी परळी न्यायालयात सुनावणी सुरु आहे. यासाठी राज ठाकरे परळी कोर्टात १२ जानेवारी रोजी हजर राहणार आहेत.