मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज ५४ वा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने राज ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी दरवर्षी त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची रीघ लागते. परंतु तब्येत ठिक नसल्यानं राज ठाकरे आज कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार नाहीत. त्यामुळे राज्यभरात कार्यकर्ते मोठ्या उत्साहात त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम, उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
राज ठाकरे आज म्हणजेच १४ जून रोजी वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी राज ठाकरेंना भेटायला हजारो कार्यकर्ते त्यांच्या निवासस्थानी येतात. मोठ्या उत्साहात त्यांचा वाढदिवस साजरा होतो. पण सध्या राज ठाकरे यांच्या पायाचं दुखणं वाढलं आहे. तसंच त्यांची हिप बोनची शस्त्रक्रिया ही होणार आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची शस्त्रक्रिया होणार होती. मात्र त्यांच्या रिपोर्टमध्ये कोविड डेड सेल्स असल्यानं ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. ही शस्त्रक्रिया पुढील आठवड्यात होणार आहे. यामुळे राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना भेटायला न येण्याचं आवाहन केलं.
औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ५४रुपये प्रति लिटर पेट्रोल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५४व्या वाढदिवसानिमित्त आज औरंगाबादमधल्या क्रांती चौकातील पेट्रोल पंपावर ५४रुपये प्रतिलिटर दराने पेट्रोल मिळत आहे. औरंगाबादमध्ये आज पेट्रोलचा दर ११२.४१ रुपये प्रति लिटर आहे. परंतु आज काही तास मनसेकडून निम्म्या दरात पेट्रोलचं वाटप केलं जात आहे. मनसे कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी आज हा उपक्रम राबवला असून पेट्रोल पंपावर सकाळपासून रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत.
राज ठाकरेंचं मनसेच्या कार्यकर्त्यांना आवाहन
माझ्या शरीरात ‘कोविड डेड सेल’ असल्यानं घरी क्वारंटाईन असल्याची माहिती देत शस्त्रक्रियेसाठी यंदा वाढदिवसानिमित्त १४ जूनला मी कोणालाही भेटू शकत नसल्याचं राज यांनी यापूर्वीच स्पष्ट केलेलं. “माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो, पुण्यातील सभेत मी सर्वांना सांगितलं की माझी एक शस्त्रक्रिया करायची आहे. मी जेव्हा रुग्णालयात दाखल झालो तेव्हा चाचणीनंतर डॉक्टरांनी ‘कोविडचा डेड सेल’ असल्याचं सांगितलं. ते काय आहे हे मला माहिती नाही, पण ती शस्त्रक्रिया रद्द झाली. आता मी कोविडमुळे १०-१५ दिवस घरी क्वारंटाईन आहे. या सगळ्या दरम्यान १४ जूनला माझा वाढदिवस आला आहे. दरवर्षी तुम्ही सर्वजण प्रेमाने उत्साहाने मला भेटायला येतात. मी देखील आपली सर्वांची आतुरतेने वाट पाहत असतो. सर्वांना भेटल्यावर बरं वाटतं. असं असलं तरी यावर्षी १४ जूनला मला कोणालाच भेटता येणार नाही. कारण या गाठीभेटींमध्ये पुन्हा संसर्ग झाला आणि परत शस्त्रक्रिया पुढे ढकलावी लागली तर शेवटी मी शस्त्रक्रिया किती पुढे ढकलायची यालाही काही मर्यादा आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात माझी शस्त्रक्रिया ठरली आहे. त्यामुळे मी कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू इच्छित नाही. म्हणून मी १४ जूनला कोणालाही न भेटण्याचा निर्णय घेतला आहे,” असं राज यांनी ऑडिओ क्लीपच्या माध्यमातून म्हटलं होतं.