५४ रुपयांत १ लिटर पेट्रोल; राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मनसेचा उपक्रम

औरंगाबाद : मागील काही दिवसांपासून इंधनाचे दर गगनाला भिडत आहे. सध्या औरंगाबादेत पेट्रोल ११२.४१ रुपये प्रतिलीटर दराने विकलं जात आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. अशावेळी एखाद्या मोठ्या राजकीय नेत्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या पक्षाकडून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जातो. असाच काहीसा प्रयत्न औरंगाबादेत मनसेच्या वतीने केला जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज ५४ व्या वाढदिवसानिमित्त आज औरंगाबादमधल्या क्रांती चौकातील पेट्रोल पंपावर ५४ रुपये प्रतिलिटर दराने पेट्रोल मिळत आहे.

औरंगाबादमध्ये आज पेट्रोलचा दर ११२.४१ रुपये प्रति लिटर आहे. परंतु आज काही तास मनसेकडून निम्म्या दरात पेट्रोलचं वाटप केलं जात आहे. मनसे कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी आज हा उपक्रम राबवला असून पेट्रोल पंपावर सकाळपासून रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला हा उपक्रम एक तास होता, परंतु गर्दी वाढल्याने हा उपक्रम दोन तास करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी दिली आहे.

राज ठाकरेंचं मनसेच्या कार्यकर्त्यांना आवाहन

माझ्या शरीरात ‘कोविड डेड सेल’ असल्यानं घरी क्वारंटाईन असल्याची माहिती देत शस्त्रक्रियेसाठी यंदा वाढदिवसानिमित्त १४ जूनला मी कोणालाही भेटू शकत नसल्याचं राज यांनी यापूर्वीच स्पष्ट केलेलं. “माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो, पुण्यातील सभेत मी सर्वांना सांगितलं की माझी एक शस्त्रक्रिया करायची आहे. मी जेव्हा रुग्णालयात दाखल झालो तेव्हा चाचणीनंतर डॉक्टरांनी ‘कोविडचा डेड सेल’ असल्याचं सांगितलं. ते काय आहे हे मला माहिती नाही, पण ती शस्त्रक्रिया रद्द झाली. आता मी कोविडमुळे १०-१५ दिवस घरी क्वारंटाईन आहे. या सगळ्या दरम्यान १४ जूनला माझा वाढदिवस आला आहे. दरवर्षी तुम्ही सर्वजण प्रेमाने उत्साहाने मला भेटायला येतात. मी देखील आपली सर्वांची आतुरतेने वाट पाहत असतो. सर्वांना भेटल्यावर बरं वाटतं. असं असलं तरी यावर्षी १४ जूनला मला कोणालाच भेटता येणार नाही. कारण या गाठीभेटींमध्ये पुन्हा संसर्ग झाला आणि परत शस्त्रक्रिया पुढे ढकलावी लागली तर शेवटी मी शस्त्रक्रिया किती पुढे ढकलायची यालाही काही मर्यादा आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात माझी शस्त्रक्रिया ठरली आहे. त्यामुळे मी कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू इच्छित नाही. म्हणून मी १४ जूनला कोणालाही न भेटण्याचा निर्णय घेतला आहे,” असं राज यांनी ऑडिओ क्लीपच्या माध्यमातून म्हटलं होतं.

Share