मुंबई : खा. नवनीत राणांना लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर राणा दाम्पत्यानी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यामुळे आता सत्र न्यायालयाने दिलेल्या अटी आणि शर्तीचे उल्लघंन केल्याने राणा दाम्पत्याचा जामीन रद्द होणार का?, या चर्चेला उधाण आले आहे.
सरकारी वकील प्रदीप घरत यांनी यावर प्रतिक्रिया देत नवनीत राणांनी न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केलं असल्याचा दावा केला आहे. इतकंच नाही तर याविरोधात ते आज न्यायालयात जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.
दरम्यान, राणा दांपत्याला प्रसार माध्यमाशी संवाद साधता येणार नसून त्यांना या प्रकरणाशी संबंधित कोणत्याही मुद्द्यावर भाष्य करता येणार नाही, असे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र, नवनीत राणा यांनी रूग्णालयातून बाहेर येताच मुख्यमंत्र्याना धारेवर धरत तुमच्यात दम असेल तर लोकांमध्ये येऊन निवडून दाखवावं, असं थेट आव्हान दिलं. नवनीत राणांच्या वक्तव्यांमुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.