‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ विजेते रणजितसिंह डिसलेंचा शिक्षकपदाचा राजीनामा

सोलापूर : जागतिक शिक्षक पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांनी सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडे आज आपला राजीनामा सादर केला. अमेरिकेत प्रदीर्घ अध्ययन रजा मंजुरीच्या मुद्यावर डिसले हे वादग्रस्त ठरले असून त्याबाबत झालेल्या चौकशीत ते दोषी आढळून आले आहेत. त्यांच्यावरील प्रशासकीय कारवाई प्रलंबित आहे.

कोण आहेत डिसले?
सोलापूर जिल्हा परिषदेच्या परीतेवाडी शाळेत २००९ साली डिसले शिक्षक म्हणून रूजू झाले. विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान आणि क्यूआर कोडच्या सहाय्याने शिकवण्यासाठी डिसले प्रसिद्ध आहेत. त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन, शिकवण्याचे नवे तंत्र विकसित केले आहे. तसेच इतर शिक्षकांनाही टेक्नोसॅव्ही होण्यासाठी प्रेरीत केले आहे. आयटीच्या प्रभावी वापरासाठी त्यांनी स्वतःची छोटेखानी प्रयोगशाळा उभारली आहे. त्याचप्रमाणे लॉकडाउनमध्येही तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करुन विद्यार्थ्यांना शिकवले.

२०१७ साली सोलापुरातील वेळापूर येथील जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्र येथे प्रतिनियुक्ती झाली. तंत्रस्नेही अशी ओळख असलेल्या डिसले यांनी विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल विज्ञान प्रयोग शिकवले.  QR कोडेड पाठयपुस्तकाची संकल्पना मांडली. लेट्स क्रॉस द बॉर्डर या उपक्रमाच्या माध्यमातून जगभरातील अशांत देशातील मुलांना एकत्र आणून त्यांच्यात अहिंसेच्या विचारांचा प्रसार करण्याचे काम केले.  कार्याची दखल घेत त्यांना  ४ डिसेंबर २०२० रोजी ग्लोबल टीचर अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  जून २०२१ मध्ये वशिंग्टन dc मधील जागतिक बँकेच्या सल्लागर पदी नेमणूक करण्यात आली. १ डिसेंबर २०२१ रोजी अमेरिकेन सरकारची प्रतिष्ठित फुल ब्राईट स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली. या स्कॉलरशिपसाठी डिसले यांना अमेरिकेत जायचे आहे.

डिसले गुरुजींवर काय आहेत आरोप
जागतिक शिक्षक पुरस्कार मिळण्यापूर्वी डिसले यांना जिल्हा परिषद शिक्षण विभागातून जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेत तीन वर्षांच्या प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले होते. मात्र ते जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेत रुजू झाल्याची नोंद कोठेही आढळून आली नाही. त्या दरम्यान, त्यांना नियमित पगारही अदा झाला होता. या प्रकरणाचीही चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले असता शिक्षण विभागाच्या पाच अधिकाऱ्यांच्या समितीने डिसले यांची चौकशी केली होती. यात ते मोठय़ा प्रमाणात दोषी असल्याचा अहवाल प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांच्याकडे सादर झाला होता. या चौकशीची फेरपडताळणी होऊन शेवटी डिसले यांच्या विरोधात कारवाईबाबतचा अहवाल जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे सादर झाला होता. त्यावर अद्यापि कोणतीही कारवाई झाली नाही.

डिसले यांनी अचानकपणे गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे आज आपले राजीनामा पत्र सादर केले. याबाबत शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी दुजोरा दिला आहे. मात्र आता त्यांच्यावर प्रलंबित असलेल्या कारवाईबाबत काय होणार याकडे शैक्षणिक क्षेत्रासह सर्वाचे लक्ष वेधले आहे.

Share