पुण्यात शिवसैनिकांचा राडा; बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड

पुणे : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेचे ३८ पेक्षा जास्त आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा टोकाचा संघर्ष सध्या पहायला मिळत आहे. बंडामुळे आता शिवसैनिकही आक्रमक झाले असून, आज शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयावर हल्लाबोल करीत कार्यालयाची तोडफोड केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यभरात शिवसेना आक्रमक झालेली पहायला मिळत आहे. राज्यात अनेक ठिकाणी शिवसैनिकांकडून बंडखोर आमदारांच्या विरोधात रोष व्यक्त केला जात आहे. अनेक ठिकाणी कट्टर शिवसैनिक रस्त्यावर उतरून एकनाथ शिंदे यांच्याविषयी नाराजी व्यक्त करीत आहेत. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना समर्थन देत कट्टर शिवसैनिक बंडखोर आमदारांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशी भाषा करीत आहेत. शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्याच्या पार्श्वभूमीवर संतप्त शिवसैनिकांनी आज शनिवारी (२५ जून) शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयाची काही तोडफोड केली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम-परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा देत ते बंडखोर आमदारांच्या गटात सामील झाले आहेत. त्यामुळे आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी आज आ. सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड करत राडा घातला. पुण्यातील कात्रज भागात बालाजीनगर येथे आमदार तानाजी सावंत यांचे मे. भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेडचे कार्यालय आहे. याच कार्यालयावर संतप्त शिवसैनिकांनी शनिवारी सकाळी हल्लाबोल करीत कार्यालयाची तोडफोड केली. शिवसैनिक हातात भगवे झेंडे घेऊन आणि घोषणाबाजी करत आ. सावंत यांच्या कार्यालयात दाखल झाले. त्यांनी थेट तोडफोड सुरू करत कार्यालयाच्या केबीनच्या काचा फोडल्या, खुर्च्या फेकल्या, कागदपत्रे अस्ताव्यस्त केली आणि घोषणाबाजी करत ते निघून गेले. जाताना त्यांनी भैरवनाथ शुगर साखर कारखान्याच्या कार्यालय बोर्डाला काळे फासले.

या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ज्या शिवसैनिकांनी तोडफोड केली त्या शिवसैनिकांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तोडफोड नेमकी कोणी केली याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. या घटनेनंतर आ. तानाजी सावंत यांचे कात्रज येथील मुख्य कार्यालय आणि त्यांच्या घराबाहेरदेखील पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

ज्या आमदारांनी बंड केले आहे ते शिवसेनेमुळे मोठे झाले आहेत. त्या सर्वांनी हे विसरता कामा नये. जे आमदार तिकडे गेले आहेत त्या सर्वांनी पुन्हा यावे, अन्यथा आज तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची अवस्था झाली आहे, तशी राज्यातील अनेक बंडखोर आमदारांची होईल, असा इशारा शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी दिला आहे.

एकनाथ शिंदे, खा.श्रीकांत शिंदे यांच्या फोटोला काळे फासले
दरम्यान, पुण्यातील सदाशिव पेठेत असणाऱ्या कार्यालयावर बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि खा.श्रीकांत शिंदे यांच्या फोटोला काळे फासण्यात आले. ही माहिती मिळताच  विश्रामबाग पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. काल शिवसैनिकांनी नाशिकमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पोस्टरला काळे फासून आंदोलन केले होते. शुक्रवारी कुर्ल्याचे शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयावर काही शिवसैनिकांनी हल्ला करत गेटची तोडफोड केली. अहमदनगरमध्ये बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांच्या फोटोला काळे फासण्यात आले. तोडफोड करणारे लोक शिवसेनेचे असल्याचा आरोप बंडखोर आमदारांच्या समर्थकांनी केला आहे. तोडफोडीच्या घटनेनंतर पोलिसांनी राज्यात हाय अलर्ट जारी केला आहे.

शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना इशारा
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड करणाऱ्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली आहे. ४८ तासांच्या आत या आमदारांना आपली भूमिका मांडण्यास सांगितले आहे. जर आमदारांनी या वेळेत आपली भूमिका मांडली नाही, तर त्यांना अपात्र ठरवण्यात येईल, अशी माहिती शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी दिली.

Share