शिर्डी : दोन वर्षांच्या कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर शिर्डी येथील साईबाबा मंदिर ऑक्टोबर २०२१ मध्ये भाविकांसाठी खुले झाले. त्यानंतर अवघ्या सात महिन्यांमध्ये साईबाबांच्या झोळीत तब्बल १८८ कोटी ५५ लाख रुपयांचे विक्रमी दान जमा झाले आहे. त्याचबरोबर मंदिर खुले झाल्यानंतर गेल्या सात महिन्यांत ६४ लाख भाविकांनी शिर्डीला येऊन साईबाबा समाधीचे दर्शन घेतले आहे. शिर्डी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी ही माहिती दिली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील श्री साईबाबा हे जगभरातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान आहे. दरवर्षी लाखो भाविक शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. अनेक भाविक आपले श्रध्दास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबांच्या दानपेटीत आपल्या कुवतीनुसार दान करत असतात. भाविक साईबाबांच्या दरबारात पैसे, सोने, चांदी आणि इतर अनेक मौल्यवान वस्तूंचे दान करतात. कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षे शिर्डी येथील साईबाबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद होते.
कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर ऑक्टोबर २०२१ मध्ये साईबाबा मंदिर भाविकांसाठी खुले झाले. त्यानंतर मंदिर सुरू झाल्यापासून गेल्या सात महिन्यांत साईभक्तांनी बाबांच्या झोळीत भरभरून दान दिले असून, ऑक्टोबर २०२१ ते मे २०२२ या सात महिन्यांत एकूण १८८ कोटी ५५ लाख रुपये साईबाबा संस्थानच्या तिजोरीत जमा झाले आहेत.
कोविडच्या दोन वर्षाच्या कालावधीत शिर्डी येथील साईबाबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद होते. त्यामुळे साईभक्तांचा ओघ थांबला होता. साईभक्तांअभावी फूल, हार, प्रसाद आणि इतर साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकांबरोबरच हॉटेल, लॉज आदी व्यवसायही ठप्प झाले होते. शिर्डी शहराचे अर्थचक्र पार कोलमडले होते. पहिल्या लॉकडाऊनमध्ये साईबाबा मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी बंद झाले. ते तब्बल आठ महिन्यांनी सुरू झाले व पुन्हा कोरोना संसर्ग वाढल्याने निर्बंधामुळे मंदिर पुन्हा बंद झाले.
त्यानंतर कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर ७ ऑक्टोबर २०२१ रोजी साईबाबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. साई दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली आणि साईबाबा संस्थानने पुन्हा एकदा भरारी घेतली. ज्याप्रमाणे साईभक्तांचा ओघ वाढला तसा साईबाबा मंदिराच्या दानपेटीतील दानाचा आकडाही वाढू लागला आहे. दिवसाकाठी हजारात येणारे दान आता कोटींमध्ये येत आहे. कोरोना काळात लॉकडाऊनमुळे शिर्डीचे अर्थचक्र पूर्णतः थांबले होते; परंतु कोरोना काळानंतर साईबाबा मंदिर सुरू झाल्याने देशभरातील साईभक्त शिर्डीत येत असल्याने शिर्डीचे अर्थचक्र पुन्हा सुरळीत झाले आहे.