नयनताराला तिरुपती मंदिरात पायात चप्पल घालून फोटोशूट करणे पडले महागात

तिरुपती : दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि विघ्नेश शिवन ६ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर ९ जून रोजी विवाहबद्ध झाले. लग्नानंतर नयनतारा आणि विघ्नेश शिवन दुसऱ्याच दिवशी तिरुपती मंदिरात देवदर्शनासाठी गेले होते. यावेळी नयनतारा पायात चप्पल घालून फिरताना दिसली. एवढेच नाही तर मंदिरात फोटो काढण्यावर बंदी असतानादेखील नयनताराने फोटोशूट केले. यावरून नयनतारा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. आता तिला तिरुमला तिरुपती देवस्थानम समितीने कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

नयनतारा ही टॉलिवूडची लेडी सुपरस्टार म्हणून ओळखली जाते. नयनतारा आणि विघ्नेश शिवन हे दोघे गेल्या सहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्या दोघांनी ९ जून रोजी सप्तपदी घेतल्या. लग्नानंतर लगेचच हे नवविवाहित जोडपे देवदर्शनासाठी १० जून रोजी तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरात गेले होते. यावेळी पिवळ्या रंगाच्या साडीत नयनतारा खूपच सुंदर दिसत होती. सोशल मीडियावर तिचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

तिरुपती बालाजी मंदिरात किंवा मग मंदिराच्या आवारात अनवाणी चालणे ही धार्मिक प्रथा आहे. असे असताना नयनतारा तिरुपती बालाजी मंदिर परिसरात अनवाणी नाही तर चप्पल घालून फिरताना दिसली. तिथे नयनताराला चप्पल घातलेले पाहून लोकांनी संताप व्यक्त केला आहे. तिरुमला तिरुपती मंदिर समितीने आरोप केला आहे की, नयनताराने मंदिर परिसरात फक्त फोटोशूट केले नाही, तर त्या मंदिरात तिने पायातल्या चप्पलदेखील काढल्या नव्हत्या.

तिरुमला तिरुपती देवस्थानम समितीचे मुख्य सुरक्षा अधिकारी नरसिंह किशोर यांनी आरोप केला आहे की, नयनतारा मंदिराच्या परिसरात पायात चप्पल घालून फिरत होती. मंदिरात फोटो काढण्यावर बंदी असतानादेखील नयनताराने फोटोशूट केले. तिला तत्काळ आमच्या सुरक्षारक्षकांनी थांबवले. सीसीटीव्ही फूटेजमध्येदेखील नयनतारा नियम धाब्यावर बसवत पायात चप्पल घालून ती फोटो काढताना दिसली आहे. मंदिर समितीने यासंदर्भात नयनतारासोबत बातचीत केली आहे आणि व्हिडीओ मेसेज करून त्या माध्यमातून माफीनामा जारी करायला सांगितला आहे. त्या व्हिडीओ मेसेजच्या माध्यमातून नयनताराने भगवान बालाजी, मंदिर व्यवस्थापन समिती आणि भक्तांची माफी मागावी, अशी आमची मागणी आहे. आम्ही नयनताराला कायदेशीर नोटीस पाठवत आहोत. आम्ही त्यांच्याशी यावर चर्चा केली असता नयनतारादेखील माफी मागायला तयार असल्याचे नरसिंह किशोर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, या चप्पलच्या वादानंतर नयनताराचा पती विघ्नेश शिवन यांनी पत्नीच्या वतीने ट्रस्टची माफी मागितली आहे. ते म्हणाले की, “तिरुपती मंदिरावर त्यांच्या पत्नीची खूप श्रद्धा आहे. ही चूक नकळत घडली. याआधी ते अनेकवेळा तिरुपती मंदिरात गेले आहेत.”

नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांनी तिरुपती मंदिरात देवदर्शनासाठी गेल्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. यावेळी नयनताराने घातलेली पिवळ्या रंगाची साडी तिच्यावर खुपच खुलून दिसत होती. विघ्नेशने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि धोती घातला होता. दोघांनी लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यावर खूप लाइक्स आणि अभिनंदनाचा वर्षाव झाला. नयनतारा आणि विघ्नेशने लग्न शाही थाटात पार पडले. या दोघांच्या लग्नासाठी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, निर्माता बोनी कपूर आदींसह अनेक दिग्गज सेलिब्रिटींची उपस्थिती होती. शाहरुख खान आणि नयनतारा दिग्दर्शक एटली यांच्या ‘जवान’ या चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहेत.

Share