राज्यात लवकरच तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांची भरती; विखे-पाटील यांची माहिती

मुंबई : राज्यातील तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया येत्या काही दिवसांमध्ये सुरु करण्यात येणार आहे. ३ हजार ११० तलाठी आणि ५१८ मंडळ‍ अधिकारी असे एकूण ३ हजार ६२८ पदे निर्माण करण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिलीय.

गेल्या काही वर्षांपासून राज्यात तलाठी पदाच्या अनेक जागा रिक्त आहेत. एकाच तलाठ्याकडे अनेक गावे सोपविण्यात आल्याने कामांना विलंब होत आहे. त्यामुळे महसूल यंत्रणेवर ताण येतोय. त्यामुळेच तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रियेला गती देण्यात येणार आहे. ३ हजार ११० तलाठी आणि ५१८ मंडळ‍ अधिकारी अशी एकूण ३ हजार ६२८ पदे निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी दिलीय.

गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तलाठ्यांसोबत कोणत्या ना कोणत्या कामामुळे संबंध येत असतो. सातबारा, विविध दाखले यासाठी नियमितपणे तलाठ्यांच्या संपर्कात राहावे लागते. त्याळे तलाठी हे पद ग्रामीण भागात अत्यंत महत्वाचे असते. आता होणाऱ्या तलाठी भरतीमुळे सध्या कार्यरत असलेल्या तलाठी वर्गाचा भार कमी होण्यास मदत होणार आहे. ३ हजार ११० तलाठी आणि ५१८ मंडळ अधिकारी यांची पदोन्नती असे एकूण ३ हजार ६२८ पदे निर्मितीला मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय ७ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात आल्याची माहिती विखे-पाटील यांनी दिलीय.

पुणे महसूली विभागाअंतर्गत एकूण ६०२ तलाठी साझे आणि १०० महसूली मंडळे आहेत. अमरावती महसूली विभागाअंतर्गत एकूण १०६ तलाठी साझे आणि १८ महसूली मंडळे आहेत. नागपूर महसूली विभागाअंतर्गत एकूण ४७८ तलाठी साझे आणि ८० महसूली मंडळे आहेत. औरंगाबाद महसूली विभागाअंतर्गत एकूण ६८५ तलाठी साझे आणि ११४ महसूली मंडळे आहेत. नाशिक महसूली विभागाअंतर्गत एकूण ६८९ तलाठी साझे आणि ११५ महसूली मंडळे आहेत. कोकण महसूली विभागाअंतर्गत एकूण ५५० तलाठी साझे आणि ९१ महसूली मंडळे आहेत. या सर्व ठिकाणी भरती होणार आहे.

Share