मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
ऋतुजा लटके म्हणाल्या की, माझे पती रमेश लटके हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत. त्यांचे प्रत्येकाशी मैत्रीपूर्ण संबंध होते. राज ठाकरे आणि प्रताप सरनाईक यांनी या मैत्रीची कदर करत ही अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतला. राज्यातील अनुभवी नेते शरद पवार यांनीही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी पाठिंबा दिला. यासाठी मी या सर्वांची आभारी आणि कायम ऋणी राहीन, असे ऋतुजा लटके यांनी म्हटले.
सगळ्या पक्षांमधील वरिष्ठ नेत्यांनी ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी पत्र पाठवली होती. प्रत्येकजण रमेश लटके यांच्या कामाचे कौतुक करत होता, तसेच ते आपले सहकारी होते, असे सांगत होता. अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध होणे, ही माझ्या पतीने केलेल्या कामाची पोचपावती आहे. ही निवडणूक बिनविरोध झाली त्यासाठी मी प्रत्येकाचे आभार मानते, असे ऋतुजा लटके यांनी म्हटले.