रॉबर्ट लेवांडोवस्की सलग दुसऱ्यांदा सर्वोत्तम पुरुष फुटबॉलपटू

बायर्न म्युनिकचा आघाडीचा फुटबाॅलपटू रॉबर्ट लेवांडोवस्की याने सलग दुसऱ्यांदा ‘फिफा’चा सर्वोत्तम पुरुष फुटबॉलपटू पुरस्कार मिळवला आहे .  पॅरिस सेंट-जर्मेनचा लिओनेल मेसी आणि लिव्हरपूलचा मोहम्मद सलाह यांना मागे टाकत या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. मागील महिन्यात मेसीने लेवांडोवस्कीला मागे टाकत विक्रमी सातव्यांदा बॅलन डी’ओर पुरस्कार पटकावला होता. मात्र, ‘फिफा’च्या पुरस्कारासाठी विविध राष्ट्रीय फुटबॉल संघांचे कर्णधार आणि प्रशिक्षक, तसेच २०० हून अधिक देशांच्या पत्रकारांनी लेवांडोवस्कीला अधिक मते दिली. चाहत्यांनी मेसीला पसंती दर्शवली होती.

लेवांडोवस्कीने मागील वर्षी उत्कृष्ट कामगिरी करताना जर्मनीतील फुटबॉल स्पर्धा बुंडेसलिगामध्ये दोन विक्रमांची नोंद केली. त्याने बायर्नकडून २०२०-२१ हंगामात ४१ गोल, तर २०२१ वर्षांत ४३ गोल करताना बायर्नचे महान खेळाडू गर्ड म्युलर यांचे विक्रम मोडले. ‘‘हे विक्रम मोडणे शक्य आहे का, असे तुम्ही मला काही वर्षांपूर्वी विचारले असते, तर मी थेट नाही असे उत्तरलो असतो. बुंडेसलिगामध्ये इतके गोल करणे मला अशक्य वाटायचे,’’ असे लेवांडोवस्की म्हणाला.

महिलांमध्ये स्पेन आणि बार्सिलोनाची खेळाडू अलेक्सिया पुतेयास ‘फिफा’च्या सर्वोत्तम महिला फुटबॉलपटूच्या पुरस्काराची मानकरी ठरली. मागील महिन्यात तिनेच महिलांचा बॅलन डी’ओर पुरस्कार मिळवला होता. चेल्सीचे थॉमस टूशेल आणि एमा हेज यांची सर्वोत्तम प्रशिक्षकांच्या पुरस्कारासाठी निवड झाली. टूशेल यांच्या मार्गदर्शनात चेल्सीच्या पुरुष संघाने चॅम्पियन्स लीगचे जेतेपद, तर हेज यांच्या मार्गदर्शनात चेल्सीच्या महिला संघाने चॅम्पियन्स लीगचे उपविजेतेपद पटकावले.

Share