तेच मैदान, तोच प्रसंग आणि शेवटही तसाच; बाळासाहेबांच्या सभेवेळीही अजान झाली आणि…

औरंगाबाद :  गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात चर्चेचा विषय ठरलेला राज ठाकरेंचा भोंग्यांचा मुद्दा. आणि त्यातही औरंगाबादमधील जाहीर सभा. ही सभा काल पार पाडली. या सभेतही राज ठाकरेंनी आक्रमक शैलीत भोंग्यांच्या मुद्द्यावरून ४ तारखेपर्यंतचा अल्टीमेटम दिला. औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर राज ठाकरे यांची सभा झाली.  या सभेत घडलेल्या एका प्रसंगाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

राज ठाकरे यांचे भाषण अंतिम टप्प्यात असताना ते मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात टीका करत होते. त्यावेळी मैदानात अचानक कसलातरी आवाज ऐकू आला. हा आवाज मशिदीतील अजानचा असल्याची चर्चा आहे. त्यानंतर राज ठाकरे प्रचंड संतापले. जर सभेत हे भोंगा सुरू करत असतील तर माझी पोलिसांना विनंती आहे, त्यांच्या तोंडात आताच बोळा कोंबा, जर सरळ सरळ मार्गाने समजत नसेल तर यानंतर महाराष्ट्रात काय घडेल, हे मला माहिती नाही. जे पोलीस अधिकारी आहे, त्यांना सांगतो, ते आताच बंद करा. माझं एक म्हणणं आहे, जर ते ऐकतच नसतील तर एकदाच काय ते होऊनच जाऊ द्या, असे राज ठाकरे यांनी म्हटले. या प्रसंगानंतर राज ठाकरे चांगलेच संतापले होते. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांत राज ठाकरे यांनी आपले भाषण आटोपते घेतले. मैदानात आलेला तो आवाज नक्की कशाचा होता, याचे गूढ अद्यापही उकललेले नाही.

असाच एक प्रसंग भूतकाळात देखील घडला होता. २००५ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांचीही मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा झाली होती. तत्पूर्वी २००४ मध्ये राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आली होती. त्यानंतर औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी आघाडीने चांगलाच जोर लावला होता. त्यामुळे औरंगाबादमध्ये शिवसेना-भाजप युतीची सत्ता टिकणार की नाही, असा पेच निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये बाळासाहेब ठाकरे यांची सभा घेण्यात आली होती. योगायोगाची गोष्ट म्हणजे राज ठाकरेंची सभा झाली त्याच मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर बाळासाहेबांची सभा होती. बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण ऐन रंगात आले असताना त्यावेळीही अचानक अजान सुरु झाली होती. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी काही क्षण थांंबत आपल्या खास शैलीत एक हात कमरेवर आणि दुसऱ्या हाताचं बोट हवेत आकाशाच्या दिशेने उंचावत ते म्हणाले होते, ‘याचसाठी मी विचारतोय, तुम्हाला औरंगाबाद हवंय की संभाजीनगर?’ बाळासाहेब ठाकरे यांच्या या वाक्यानंतर मैदानात टाळ्यांचा कडकडाट झाला होता. विशेष म्हणजे या सभेमुळे औरंगाबाद महानगरपालिकेत सलग चौथ्यांदा शिवसेना आणि भाजपची सत्ता आली होती.

असाच प्रसंग काल राज ठाकरे यांच्या सभेतही घडला. त्यामुळे सगळ्यांना बाळासाहेबांचीच आठवण आली. राज ठाकरे यांनीही मैदानात आवाज ऐकल्यानंतर सडकून टीका केली. जर ते ऐकतच नसतील तर एकदा काय ते होऊनच जाऊ द्या,असे वाक्य राज ठाकरे यांनी उच्चारताच मनसैनिकांना स्फुरण चढले होते. आता याचा कशाप्रकारे फायदा मनसेला होणार हे बघणे गरजेचे आहे.

Share