संजय राऊतांना दिलासा नाहीच; ८ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. आज कोर्टाने संजय राऊत यांची ईडी कोठडी आणखी ४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. संजय राऊत यांना ८ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे राऊत यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे.

पत्राचाळीतील घोटाळ्याच्या आरोपाप्रकरणी संजय राऊत यांना ३१ जुलै रोजी ईडीने ताब्यात घेतले होते. त्यानंतर मध्यरात्री राऊतांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कोर्टाने त्यांना तीन दिवसांची ईडी कोठडी सुनावली होती. त्यानंतर आता त्यांना पुन्हा चार दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. संजय राऊतांच्या चौकशीसाठी अधिक वेळ मागत ईडीने कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर कोर्टाने त्यांना चार दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.

संजय राऊत यांच्यावर ईडीने कोणते आरोप केले?
संजय राऊत यांचा पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप ईडीने केला. त्यांचे भाऊ प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून १२२ कोटी रुपये मिळाले. त्यातील १ कोटी ६ लाख ४४ हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. अलिबाग येथे याच पैशातून जमीन खरेदी करण्यात आली. राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. या प्रकरणात ज्यांचं नाव सुरुवातीला समोर आलं होतं आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती ते प्रविण राऊत हे नावालाच होते, या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊत असल्याचा दावा ईडीने केला. संजय राऊत हेच प्रविण राऊत यांना समोर करून सर्व व्यवहार करत होते असं ईडीने न्यायालयात सांगितलं. मग पत्राचाळ गैरव्यवहारातील पैसे असो की दादर येथील घर आणि अलिबाग येथील जमीन सर्व व्यवहार संजय राऊत यांच्या सांगण्यावरूनच करण्यात आले. येस बँक घोटाळा प्रकरणी वाधवान बंधू यांच्यासोबत प्रविण राऊत यांचं नाव आलं असून या प्रकरणीही संजय राऊत यांची भविष्यात ईडीकडून चौकशी केली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Share