चिन्ह गोठवल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई :  केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह कोणालाच वापरता येणार नाहीय. एवढंच नाही तर ठाकरे गटाला आणि शिंदे गटाला शिवसेना पक्षाचं नावही लावता येणार नसल्याचं आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे दोन्ही गटाला मोठा धक्का बसला आहे. अशातच या संपूर्ण वादावर शिवसेनेचे खासदार आणि सध्या कोठडीमध्ये असलेले संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

संजय राऊत यांनी म्हटले की, शिवसेना पक्षाचे नवीन चिन्ह कदाचित क्रांती घडवून आणेल आणि भविष्यात आम्ही अधिक सक्षम होऊ. आमच्यात शिवसेनेचं ‘स्पिरीट’ असल्याचे त्यांनी सांगितले. या आधीही जनसंघ, काँग्रेस यांच्यावरही चिन्ह गोठवण्याची वेळ आली होती. यात काही नवीन नाही. नवीन चिन्हानंतर हे पक्षही मोठे झाले. आपणही मोठे होऊ असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला. खरी शिवसेना कोणती आहे, हे लोकांना ठाऊक आहे. त्यामुळे चिन्ह बदललं तरी लोक आपल्याशी जोडले जातील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटांकडून निवडणूक आयोगाला तीन निवडणूक चिन्हांचा पर्याय देण्यात आला आहे. यामध्ये त्रिशुळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल असे तीन पर्याय देण्यात आले आहेत. त्याशिवाय, पक्षाच्या नावांसाठी तीन पर्याय देण्यात आले आहेत. यामध्ये शिवसेना-बाळासाहेब ठाकरे, शिवसेना-बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे  या तीन नावांचा समावेश आहे.

Share