संजय राऊतांना पुन्हा तुरूंगाचा रस्ता दाखवणार; राणेंचा इशारा

मुंबई : संजय राऊत यांनी २६ डिसेंबरला लिहलेल्या अग्रलेखाचं कात्रण मी जपून ठेवले आहे. संजय राऊत याला पुन्हा जेलचा रस्ता दाखवणार, असा इशारा केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिला. ते शुक्रवारी कणकवली पर्यटन महोत्सवाच्या व्यासपीठावरून बोलत होते.

केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, माझ्याकडे कात्रण आहे, मी वकिलाकडे पाठवून ठेवलंय. मी असं वाचून विसरणारा नाही, दखल घेणारा आहे. वाईट स्वभाव आहे माझा. २६ डिसेंबरच्या सामनाच्या अग्रलेखाचं कात्रण जपून ठेवलं आहे. संजय राऊतला सोडणार नाही. ती त्याच्यावर केस करणार आहे. १०० दिवस कमी वाटले म्हणून त्याला वाटलं परत जावं. म्हणून रस्ता मोकळा करतोय परत जायला, असं केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले.

सामनातील अग्रलेखात काय लिहिलं होतं?
ठग-पेंढाऱ्यांचे राज्य! या मथळ्याखाली २६ डिसेंबरचा अग्रलेख प्रकाशित झाला होता. यात नारायण राणेंचा उल्लेख न करता म्हटलं होतं की, सिंधुदुर्गात रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणेंचा खून पचवणारे दुसऱ्यांकडे बोट दाखवतात. या तिन्ही खुनांच्या तपासासाठी फडणवीस एखादी एसआयटी नेमणार असतील तर कोकणातले १०० सांगाडे पुरावे म्हणून त्या एसआयटीसमोर स्वत:च हजर होती. पण श्रीमान फडणवीस ते करणार नाहीत. ढेकणासंगे हिराही भंगला अशी त्यांची गत झालेली दिसते.

Share