सेनेने औरंगजेबाच्या कबरीवर डोकं ठेवणाऱ्यांकडेच दोन मतांसाठी भीक मागितली- संजय केनेकर

औरंगाबाद : “शिवसेनेने सत्ता मिळविण्यासाठी औरंगजेबाच्या कबरीवर डोकं ठेवणाऱ्यांकडेच दोन मतांसाठी भीक मागितली, ही तर लाचार सेनेची लाचारी आहे.” अशी टीका भाजप शहरजिल्हा अध्यक्ष संजय केनेकर यांनी केली आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणूकीत तीन जागांवर विजय मिळविल्याबद्दल औरंगाबादमध्ये आज भाजपकडून जोरदार विजयोत्सव साजरा करण्यात आला. उस्मानपुरा येथील भाजप कार्यालयासमोर मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमा झाले होते. मोठमोठ्याने घोषणाबाजी करत, ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांची आतिशबाजी करत हा विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना केनेकर म्हणाले, ‘संजय राऊत हे कसेतरी वाचले, राऊतच पडले असते तर वाघाची कातडी निघाली असती आणि शेळी दिसली असती. तसेच चंद्रकांत खैरेंना मी सावध करु इच्छितो की यापुढे महाविकास आघाडी ही एमआयएमसोबत युती करेल आणि औरंगाबादमधून खासदारकीसाठी इम्तियाज जलील यांनाच तिकीट देईल. त्यामुळे खैरैंना आता सावध राहण्याची गरज आहे. औरंगजेबाच्या कबरीवर डोकं ठेवणाऱ्यांकडेच सेनेला भीक मागावी लागली आहे. त्यामुळे लाचार सेनेची लाचारी पुन्हा एकदा महाराष्ट्राला दिसली आहे. असे म्हणत केनेकरांनी सेनेवर जोरदार टीका केली आहे.

यावेळी भाजप शहरजिल्हा अध्यक्ष संजय केनेकर, बसवराज मंगरुळे, प्रवीण घुगे, राजेश मेहता, राज वानखेडे, समीर राजुरकर, अनिल मकरिये, बापू घडामोडे, राम बुधवंत आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. तसेच भाजप महिला मोर्चाचा माधुरी अदवंत, पुजा सोनवणे, वंदना दहिवाल, लता दलाल, वर्षा साळुंखे, रोहिणी खैरे आदिंची उपस्थिती होती.

 

 

Share