संजय राऊत पराभवाचे खापर अपक्षांवर कसे फोडू शकतात?

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार पराभूत झाले; पण त्यांच्या पराभवाचे खापर संजय राऊत अपक्षांवर कसे फोडू शकतात? असा खडा सवाल अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी केला आहे. मी अजितदादांशी चर्चा करूनच मतदान केले. त्यानुसार पहिल्या पसंतीचे मत मी संजय पवार यांनाच दिले आहे. त्यांना दुसऱ्या क्रमाकांची मते कमी मिळाली हे खरे आहे; पण मी माझे काम केला आहे, मी कुठल्याही प्रकारचा दगाफटका केला नाही, असेही आ. देवेंद्र भुयार म्हणाले.

काही अपक्ष आमदारांनी आम्हाला शब्द देऊन नंतर त्यांनी तो शब्द फिरवला. त्यामुळे आमच्या उमेदवाराचा पराभव झाला, असे म्हणत शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी संजय पवार यांच्या पराभवाचे खापर अपक्ष आमदारांवर फोडले. संजय राऊत यांनी शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीला दगा देणाऱ्या आमदारांची नावे जाहीरपणे सांगितली. वसई-विरारच्या हितेंद्र ठाकूर यांची तीन मते आम्हाला मिळाली नाहीत. त्यानंतर करमाळ्याचे संजयमामा शिंदे, नांदेडचे श्यामसुंदर शिंदे आणि अमरावतीचे देवेंद्र भुयार या आमदारांची मते आम्हाला मिळाली नसल्याचे संजय राऊत म्हणाले. मात्र, राऊतांचे केलेले आरोप आ.देवेंद्र भुयार यांनी साफ फेटाळून लावले आहेत.

आ.देवेंद्र भुयार म्हणाले, पहिल्या क्रमांकाची ३३ मते संजय पवारांना दिलेली आहेत तर धनंजय महाडिकांना २३ मते मिळाली आहेत. म्हणजे दहा मतांचा फरक आहे. मग ही १० मते कुणाची आहेत? आमचीच तर आहेत ना? दुसऱ्या क्रमाकांची मते संजय पवारांना जेवढी मिळायला पाहिजे होती, तेवढी मिळाली नाहीत, हे खरे आहे. मी महाविकास आघाडीसोबत पहिल्या दिवसापासून आहे. सरकार स्थापन होण्याआधीपासून मी अजितदादांसोबत आहे, शिवसेना नंतर सरकार स्थापन करण्यासाठी आली, अशा शब्दात आमदार भुयार यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले.

दगाफटका केला नाही, संजय राऊतांची तक्रार करणार

आपण कुठल्याही प्रकारचा दगाफटका केला नाही. पहिल्या पसंतीचे मत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना, तर दुसऱ्या पसंतीचे मत संजय राऊत यांना दिले. तिसऱ्या पसंतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांना मतदान केले. मात्र, आपल्यावर चुकीच्या पद्धतीने आक्षेप घेतला जात असून, शिवसेना नेते संजय राऊत यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे आ. देवेंद्र भुयार यांनी सांगितले. मी सुरुवातीपासूनच महाविकास आघाडीसोबत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमचे नेते आहेत. त्यांचा शब्द आपल्यासाठी प्रमाण आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत आपण महाविकास आघाडीच्या विरोधात काम केले नाही, आपल्यावर होत असलेले आरोप पूर्णत: चुकीचे आहेत, असे आ. भुयार यांनी स्पष्ट केले.

संजय राऊत ब्रह्मदेव आहेत का?
संजय राऊत ब्रह्मदेव आहेत का हे समजत नाही. मतदान हे गोपनीय असते. आम्ही त्यांना मत दिले नाही हे त्यांना कसे कळले. ज्यावेळी महाविकास आघाडी झाली त्यामध्ये शिवसेना नंतर आली. लोकसभा निवडणुकीपासून मी महाविकास आघाडीसोबत आहे. शिवसेना नंतर आली आहे. त्यामुळे कोणी मतदान दिले नाही, असे सांगण्याचा अधिकार संजय राऊतांना नाही. मी पहिल्या दिवसापासून दगाफटका केलेला नाही. माझी मुख्यमंत्र्यावर नाराजी आहे; पण वैयक्तिकरित्या नाही. माझ्या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यात मुख्यमंत्री कमी पडले ही खंत मी बोलून दाखवली. बोलून दाखवल्याशिवाय त्यांना कसे कळणार आहे? मुख्यमंत्री कुटुंबप्रमुख आहेत. मग कुटुंबप्रमुखाला सांगायचे नाही तर दाऊद इब्राहिमला सांगायचे का? त्यामुळे त्यांच्या पक्षावर किंवा उमेदवारावर नाराजी आहे असे होत नाही,” असे आ.देवेंद्र भुयार यांनी म्हटले आहे.

Share