भाजपाचे ज्येष्ठ आमदार अरविंद गिरी यांचं निधन

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरमधील गोला मतदारसंघाचे पाच वेळा आमदार राहिलेले अरविंद गिरी यांचं आकस्मिक निधन झालं. लखनौ येथील एका सभेसाठी जात असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला. त्यातच त्यांचं निधन झालं.

लखीमपूर खेरी जिल्ह्यातील गोला विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार अरविंद गिरी यांचे निधन अत्यंत दु:खद आहे, मी त्यांच्या परिवाराविषय शोक व्यक्त करतो, प्रभू श्रीराम दिवंगत आत्म्याला त्यांच्या चरणी स्थान देवो. हे कधीही न भरून येणारे नुकसान सोसण्याची शक्ती कुटुंबियांना देवो”  अशा शब्दात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अरविंद गिरी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

कोण होते अरविंद गिरी?
अरविंद गिरी यांचा जन्म ३० जून १९५८ रोजी झाला. १९९४ मध्ये समाजवादी पक्षातून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. १९९५ मध्ये ते विक्रमी मतांनी विजयी झाले आणि गोला नगरपालिकेचे अध्यक्ष झाले. यानंतर १९९६ मध्ये प्रथमच सपाच्या तिकिटावर ४९ हजार मते मिळवून ते आमदार झाले. २००० मध्ये ते पुन्हा गोला पालिका परिषदेचे अध्यक्ष झाले.

२००२ मध्ये अरविंद गिरी सपाच्या तिकिटावर दुसऱ्यांदा आमदार झाले. २००५ मध्ये, सपा सरकारच्या काळात त्यांनी आपल्या भावाची पत्नी अनिता गिरी यांची जिल्हा पंचायत अध्यक्षपदी निवड केली. २००७ मध्ये पत्नी सुधा गिरी यांची गोला नगरपरिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर २००७ मध्ये ५८ हजार मते मिळवून ते तिसऱ्यांदा आमदार झाले. २०१२ ची निवडणूक त्यांनी बसपाच्या तिकिटावर जिंकली होती.

Share