शेतकरी नेते राकेश टीकैत यांच्यावर पत्रकार परिषदेत शाईफेक, तुफान राडा

बंगळुरु : कर्नाटकात भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. बंगळुरूच्या प्रेस क्लबमध्ये ही घटना घडली. तिथे टिकैत पत्रकार परिषद घेत होते. त्यावेळी अचानक एका व्यक्तीने त्यांच्यावर शाई फेकली. त्यानतंर टिकैत यांच्या समर्थकांनी त्याला चांगलाच चोप दिला. यावेळी पत्रकार परिषदेत चांगलीच हाणामारी झाली.  उपस्थितांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्या. घटनेवेळी टिकैत यांचे सहकारी युद्धवीर सिंहही उपस्थित होते. टिकैत यांनी या घटनेसाठी पोलिसांना जबाबदार धरले आहे. ते म्हणाले, पोलिसांनी सुरक्षेची योग्य ती काळजी घेतली नाही. हे सरकारचे कारस्थान आहे.

टिकैत बंगळुरूत एका वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनच्या व्हिडिओवर स्पष्टीकरण देण्यासाठी पोहोचले होते. या व्हिडिओत कर्नाटकातील शेतकरी नेते कोडिहल्ली चंद्रशेखर पैशांची मागणी करताना दिसून येत आहेत. राकेश व युद्धवीर यांनी आपला यात हात नसल्याचे स्पष्ट केले. तसेच धोकेबाज शेतकरी नेते कोडिहल्ली चंद्रशेखर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत दोन्ही पक्षांत चांगलाच वाद झाला. अखेर या वादाचे हाणामारीत रुपांतर झाले. यावेळी टिकैत यांच्यावर शाईफेक करण्यात आली.  टिकैत यांनी शाईफेक व गदारोळ करणारे चंद्रशेखर यांचे समर्थक असल्याचा दावा केला आहे. शेतकरी सभेचे अध्यक्ष अवनीश पवार यांनीही या घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे. तर किसान यूनियनचे सरचिटणीस सावित मलिक यांनी अशा घटनांना भीक घालणार नसल्याचे ठणकावून सांगितले आहे. शेतकऱ्यांवर यापूर्वीही अनेकदा लाठीमार झाला. आम्ही अशा शाईला भीक घालत नाही, असे ते म्हणाले.

Share