‘शक्तीमान’; Mukesh Khanna

छोट्या पडद्यावरील सुपरहिरो ‘शक्तिमान’ ही मालिका ९०च्या दशकात खूप लोकप्रिय होता. लहानग्यांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत ही मालिका लोकप्रिय होता. या मालिकेला अनेक वर्ष झाली असली तरी हा शो आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. या मालिकेतून ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांनी ‘शक्तिमान’च्या भूमिकेत प्रेक्षकवर्गामध्ये छाप पाडली. आता हे पात्र मोठ्या पडद्यावर आणण्याची तयारी सुरु झाली आहे. लवकरच शक्तिमान हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळाली. मुकेश खन्ना यांनी रणवीर सिंह भूमिका साकारणार असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर रणवीर सिंह शक्तिमान भूमिका साकारण्याला तीव्र विरोध व्यक्त केला. अभिनेत्याने रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटवर टीका करत त्याच्या अशा भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणवीर सिंह ‘शक्तिमान’च्या व्यक्तिरेखेवर आधारित चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचं समोर आलं आहे. मात्र, रणवीर सिंहला ‘शक्तीमान’च्या भूमिकेसाठी कास्ट केल्याच्या वृत्तामुळे मुकेश खन्ना यांनी संताप व्यक्त केला आहे. मुकेश खन्ना यांनी रणवीरला आयकॉनिक भूमिकेसाठी कास्ट करण्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. ‘शक्तिमान’च्या भूमिकेसाठी रणवीर सिंहच्या कास्टिंगच्या अफवांवर मुकेश खन्ना यांनी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये आपला राग व्यक्त केला आहे.

मुकेश खन्ना यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “सोशल मीडियावर अनेक महिन्यांपासून रणवीर शक्तीमान साकारणार असल्याची चर्चा होती आणि प्रत्येकजण याबद्दल नाराज होता, मीदेखील गप्प राहिलो. पण जेव्हा वाहिन्यांनी रणवीरला साइन केल्याची घोषणा सुरु केली तेव्हा मला तोंड उघडावे लागले. आणि मी म्हणालो की अशी प्रतिमा असलेला माणूस कितीही मोठा स्टार असला तरी तो शक्तीमान होऊ शकत नाही. मी माझी पावले मागे घेतली आहेत. आता बघूया पुढे काय होते?”. त्यांनी या व्हिडिओमध्ये बोलताना सांगितलं, की रणवीर सिंहची स्टार पॉवर असूनही तो कधीही शक्तीमानची भूमिका करू शकत नाही. त्यांनी रणवीरच्या न्यूड फोटोशूटला बालिश म्हणत, ‘शक्तीमान’च्या भूमिकेसाठी तो चुकीची निवड असल्याचं म्हटलं आहे.

Share