शरद पवारांकडून जातीय ध्रुवीकरणासाठी विशिष्ट समाजाचे लांगूलचालन

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एकापाठोपाठ एक तब्बल १४ ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शरद पवारांकडून जातीय ध्रुवीकरणासाठी विशिष्ट समाजाचे लांगूलचालन केले जात असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

कलम ३७०, इशरत जहाँ अशा वेगवेगळ्या मुद्द्यांचा संदर्भ देत फडणवीस यांनी पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे फडणवीसांनी या ट्विट्ससोबत पवारांच्या वक्तव्यांच्या लिंक्स जोडल्या आहेत. आज डॉ. आंबेडकर जयंती असताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कलम ३७० ला कडाडून विरोध होता, याचे स्मरण करून देताना राष्ट्रवादीने याबाबत घेतलेल्या भूमिकेवर फडणवीस यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘काश्मीर फाईल्स’ या चित्रपटावरून अलीकडेच शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यांचाही त्यांनी समाचार घेतला आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना अटक होताच, ते मुस्लिम आहेत, म्हणून त्यांचा संबंध दाऊदशी जोडला जातोय, या विधानाचे तसेच इशरत जहाँ ही निर्दोष होती, याबाबत पवारांनी केलेल्या विधानाचेही त्यांनी स्मरण करून दिले आहे. एवढेच नाही तर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी इशरत जहाँच्या मदतीसाठी केलेल्या प्रयत्नांचाही उल्लेख त्यांनी केला आहे.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1514511639466606599?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1514511639466606599%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fnews%2Fmumbai%2Fdevendra-fadnavis-tweet-thread-about-ncp-sharad-pawar-latest-updates-1050371

 

२०१२ मध्ये मुंबईत आझाद मैदानात हिंसाचारानंतर कशी ढिलाई दाखविली आणि रझा अकादमीवर कारवाई केली नाही, याचाही उल्लेख फडणवीस यांनी केला असून, संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षणाला विरोध असताना मुस्लिम आरक्षणासाठी सातत्याने पुढाकार का घेतला, असा प्रश्न त्यांनी पवारांना विचारत सच्चर समितीचा अहवाल लागू करण्यासाठी केलेल्या मागणीचाही उल्लेख केला आहे. अल्पसंख्याक समाज कोणाचाही पराभव करू शकतो, या विधानाचे स्मरण करून देताना ‘हिंदू टेरर’ हा शब्दप्रयोग सर्वप्रथम कुणी केला, असे विचारत, मुंबई बॉम्बस्फोटानंतर १३ वा बॉम्बस्फोट हा मुस्लिम वस्तीत झाल्याचे खोटे सांगितल्यावरसुद्धा प्रश्न उपस्थित केल्याबद्दल फडणवीसांनी पवारांवर निशाणा साधला आहे. ‘काश्मीर फाईल्स’ या चित्रपटामध्ये काश्मिरी पंडितांच्या वेदनांचे चित्रण असताना असा दुटप्पीपणा का? तुमच्या छद्मी धर्मनिरपेक्षतेच्या अजेंड्याला धक्का बसेल म्हणून? ‘काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. मग केवळ अनुनयाच्या हेतूने जातीय विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतात हे स्वीकारार्ह नाही, असे म्हणत फडणवीस यांनी पवारांवर टीका केली आहे.

Share