यंदा देशात ९९ टक्के पाऊस

मुंबई : भारतीय हवामानशास्त्र विभागाने देशातील नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. यंदा देशात सरासरीच्या ९९ टक्के पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एका प्रकारचा दिलासा मिळाला आहे.

जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या पावसाचा पहिला अंदाज आज गुरुवारी भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) जाहीर केला आहे. त्यानुसार यंदा देशात पाऊसमान सामान्य राहण्याचा अंदाज आहे. यावर्षी संपूर्ण देशात नैऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) सरासरी ९९ टक्के बरसणार असून, तो सामान्य म्हणजे ९६ ते १०४ टक्के राहील, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. २०२२ मध्ये पावसाची दीर्घकालीन सरासरी (एलपीए) ९९ टक्के राहण्याची शक्यता आहे. १९७१-२०२० या कालावधीत संपूर्ण देशात मॉन्सून हंगामातील पावसाची दीर्घकालीन सरासरी ८७ सें. मी. एवढी आहे. प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागात ला-निना परिस्थिती आहे. ला-निनाची स्थिती पावसाळ्यात कायम राहण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. महापात्रा यांनी सांगितले की, यंदा देशात सर्वदूर ९९ टक्के पाऊस पडेल. मात्र, पूर्वोत्तर राज्यात तो सरासरीपेक्षा कमी पडेल तर राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र या राज्यांत तो सरासरीपेक्षा जास्त पडण्याची शक्यता आहे. मान्सून केरळात नेमका कधी येईल ते आत्ताच सांगता येणार नाही. आम्ही १५ मे रोजी ती तारीख जाहीर करणार आहोत. भारताचा उत्तरेकडील भाग, मध्य भारत, हिमालयाच्या पायथ्याशी आणि वायव्य भारताच्या काही भागांमध्ये सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. ईशान्य भारतातील अनेक भागात, देशाचा वायव्य भाग आणि दक्षिण भारतात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

‘ला-नीना’ आणि ‘आयओडी’ ची स्थिती चांगली
यंदा भारतीय समुद्री स्थिरांक (आयओडी) ची स्थिती सकारात्मक असल्याने देशात पाऊस चांगला होईल. मात्र, ऑगस्टनंतर ला-नीना तटस्थ होणार आहे. त्या पुढची स्थिती आम्ही दर महिन्याला सांगणार आहोत. यंदा देशात खूप जास्त तापमान आहे. त्याचा मॉन्सूनवर चांगला अथवा वाईट परिणाम होईल काय? या प्रश्नाचे उत्तर देताना डॉ. महापात्रा म्हणाले, खूप जास्त तापमान किंवा कमी तापमानाचा मान्सूनची थेट संबंध नाही. १९७१ ते २०२० इतक्या वर्षातील पावसाच्या आकडेवारीवर यंदाचा अंदाज आम्ही दिला आहे.
संपूर्ण देशात मॉन्सून (जून ते सप्टेंबर) सामान्य म्हणजे दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या (LPA) ९६ ते १०४ टक्के राहण्याची शक्यता आहे. १९७१-२०२० च्या डेटावर आधारित, भारतातील वार्षिक पर्जन्यमानात मान्सूनचा ७४.९ टक्के वाटा आहे. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यातील मॉन्सून हंगामात अनुक्रमे १९.१ टक्के, ३२.३ टक्के, २९.४ टक्के आणि १९.३ टक्के पावसाचे योगदान आहे. १९६१-२०१० मधील डेटाच्या तुलनेत हे आकडे बदलत राहिले आहेत, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

https://twitter.com/Indiametdept/status/1514498347176173572?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1514498347176173572%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fpudhari.news%2Fnational%2F158920%2Findia-is-likely-to-receive-normal-monsoon-rains-this-year-said-imd%2Far

दोन दिवसापूर्वीच हवामानाची माहिती देणाऱ्या ‘स्कायमेट’ या खासगी संस्थेने देशभरातील यंदाच्या पावसाचा अंदाज जारी केला होता. यंदा ९८ टक्के राहण्याची शक्यता ‘स्कायमेट’ ने वर्तवली होती. आज भारतीय हवामानशास्त्र विभागाने मॉन्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार यंदा देशात चांगला पाऊस होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गेले दोन वर्ष संपूर्ण जग कोरोनाच्या सावटाखाली होते. आता थोडासा धोका कमी झाला आहे. तसेच वाढत असलेली महागाई, वाढते तापमान, अशातच पाऊसमान चांगले होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी मॉन्सून महत्त्वाचा आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा तर आहेच; पण कॉर्पोरेट कंपन्यांपासून ते शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांपर्यंतही त्याचा खोलवर परिणाम होतो. त्यानुसार भारतीय हवामान विभागाने आज मॉन्सूनबाबत जाहीर केलेला अंदाज महत्त्वाचा मानला जात आहे.

Share