मृत्युनंतरचे जग अनुभवण्यासाठी तिने तेराव्या वर्षीच संपविले जीवन

नागपुर : वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी आठवीत शिकणाऱ्या मुलीला मृत्युनंतरच्या जगाचे कुतुहल लागले आणि याच कुचुहलापोटी या मुलीने आत्महत्या करुन घेत आपले जीवन संपविल्याची धक्कादायक घटना नागपुरमधील चंद्रमणी नगरात घडली. आर्या हरिश्चंद्र मानकर असे या विद्यार्थीनीचे नाव असून ती आठवीत शिकत होती.

अत्यंत हुशार असलेल्या आर्याला मृत्युनंतरचे जग कसे असते, याचे प्रचंड कुतूहल होते. त्यामुळे वेगवेगळ्या थिंकरचे भाष्य वाचत होती. ते आपल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवत होती. मिथिला पाटकर, डॉ. हंसा योगेंद्र यांचे या संबंधीचे काही उतारेही तिने लिहून ठेवले होते. ‘डेथ इज दी गोल, मॅच्युरिटी इज दी वे’ असा विचार तिने ठळकपणे नोंदवून ठेवला होता. घरच्या बाहेरच्यांशी वागताना ती तशी सामान्यच वागत होती. मात्र, नंतर ती वेगळ्याच विश्वात हरवत होती.  ‘आय लाइक डेथ, आय डोन्ट लाइक लाइफ.’ मृत्यूने लवकर यावे, असे तिचे विचार होते. ते तिने वेगवेगळ्या बुकमध्ये लिहून ठेवले होते. तिची ही नकारात्मकतेकडची वाटचाल काही महिन्यांपासून सुरू झाली होती. मात्र, घरच्यांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. छोटी आहे, असे समजून तिच्याकडे दुर्लक्ष केले.

सोमवारी दुपारी १.३० च्या सुमारास ती, तिचा भाऊ आणि आई घरात होते. आई आंघोळीला गेली, तर भाऊ अभ्यासात गुंतल्याचे बघून तिने गळफास लावून घेतला. आई आंघोळीवरून परतल्यानंतर आर्या गळफास लावलेल्या अवस्थेत दिसताच, तिने हंबरडा फोडला. लगेच भाऊ धावून आला. मायलेकांनी आर्याला खाली उतरविले. डॉक्टरला दाखविले असता, त्यांनी आर्याला मृत घोषित केले. दरम्यान, तिचे वडील हरिश्चंद्र मानकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Share