मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्यावतीने संजय राऊत आणि संजय पवार यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.
राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर संजय राऊत म्हणाले, शिवसेनेच्या दोन उमेदवारांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मी स्तव: आणि कोल्हापुरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते. मी खात्रीने सांगू शकतो की, या वेळी शिवसेनेचे दोन्ही उमेदवार राज्यसभेवर जातील यात शंका नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल उमेदवार असतील आणि माझ्या माहितीप्रमाणे ३१ मे रोजी ते अर्ज भरतील. काँग्रेसचा उमेदवारही लवकरच आपला अर्ज दाखल करेल. महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
कोण आहेत संजय पवार?
शिवसनेचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख असलेले संजय पवार हे गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय आहेत. गेल्या ९ वर्षांपासून ते कोल्हापूर जिल्हाप्रमुख म्हणून सक्रिय आहेत. स्थानिक राजकारणावर त्यांची मजबूत पकड आहे. कोल्हापुरात पक्षबांधणीचं जोमानं काम केलं. आण्णासाहेब पाटील महामंडळाचे ते उपाध्यक्ष आहेत. एवढंच नाहीतर, तीन वेळा कोल्हापूर महापालिकेत शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले होते. शिवसैनिक ते नगरसेवक आणि त्यानंतर जिल्हाप्रमुख असा सेनेतील त्यांचा प्रवास. उच्चशिक्षित आणि संघटन कौशल्य असल्यानं पश्चिम महाराष्ट्रातील शिवसैनिकांमध्ये संजय पवार यांच्या नेतृत्त्वाची छाप आहे. तसेच, एक कडवट शिवसैनिक म्हणून त्यांची पंचक्रोशीत ओळख आहे. यासोबतच, सिमा प्रश्नी आंदोलनताही तब्बल ३०वर्षे संजय पवार सहभागी आहेत.