संजय राऊतांची आठ वर्षांपासून अनैतिक कामे सुरू: चंद्रकांत पाटील यांचा टोला

मुंबई : महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकार आल्यापासून म्हणजे २०१४ पासून ते आताच्या महाविकास आघाडी सरकारपर्यंत, महाराष्ट्रात यंत्रणेबद्दल संशय निर्माण करणे आणि यंत्रणा मोडणे आणि जे जे अनैतिक आहे, म्हणजे शिवसेना-भाजपचे जे सख्य होते त्यात काडी टाकणे, बाळासाहेब ठाकरेंपासून शिवसेना-भाजपचा ज्यांच्याबद्दल द्वेष होता, त्या शरद पवारांशी दोस्ती करणे, हे जे जे अनैतिक आहे, ते करण्याचा आणि मांडण्याचा प्रयत्न संजय राऊत यांनी गेल्या आठ वर्षांपासून केला आहे. त्याच प्रयत्नातून काहीही झाले की, केंद्रावर आरोप करायचे, असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे.

शिवसेनेचे नेते आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित सात ठिकाणी ‘ईडी’ने आज छापा टाकत कारवाई केली आहे. या कारवाईवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली होती. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला आहे.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, केंद्रीय तपास यंत्रणांनी केलेली आतापर्यंतची जवळपास सर्व कारवाई कोर्टात टिकली; पण कोर्टावरही त्यांचा अविश्वास आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिकांशी संबंधित प्रकरणंही कोर्टाने नाकारली नाहीत. आरोपपत्राबातही सहमती दर्शवली आणि खटला पुढे चालवण्याची परवानगी दिली. दरवेळी कोर्ट यांच्याच बाजूने कसा निर्णय देते, अशी शंका उपस्थित केली जाते. संजय राऊत यांचे ते कामच आहे, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

सगळ्या कारवाया कोर्टामध्ये टिकल्या, मग त्यांनी केलेल्या आरोपामुळे त्यांचा कोर्टावर विश्वास नाही का, असा प्रश्न उपस्थित होतो. आम्ही केलेले सगळे आरोप कोर्टात टिकले; पण त्यांच्यावर कारवाई झाली तर ते त्यांच्यावर सुडबुद्धीने कारवाई केल्याचे आरोप करतात. अनिल देशमुखांवर कारवाई होईना, त्यावेळी कोर्टात याचिका करण्यात आली. कोर्टाने सीबीआय चौकशीचा निर्णय दिला. ही चौकशी केंद्र सरकारने किंवा देवेंद्र फडणवीस यांनी लावली नाही. तुमच्याकडे पुरावे असतील तर तुम्हालाही कोर्टाचे दार उघडे आहे, असे पाटील म्हणाले. आपल्या म्हणण्याला कुठलाही आधार नाही हे त्यांना माहिती आहे. यामुळे ते कोर्टात कसे जाणार? असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला.

सदानंद सुळेंच्या टीकेला उत्तर

सुप्रियाताई सुळेच नाही तर कुठल्याही सामान्य महिलेचा आदर करण्याचा आपला स्वभाव आहे. भाजपच्या विधानसभेत जेवढ्या महिला आमदार आहेत, तेवढ्या कोणत्याही पक्षाच्या नाहीत. ग्रामीण भागात काही म्हणी आहेत. पोरालाही आई म्हणते, मसणात जा तिकडे. मसणात जाण्याचा आईच्या बोलण्याचा अर्थ पोराला स्मशानभूमीत पाठवण्याचा नसतो. जमत नसेल तर सोडू दे हे, असेही ग्रामीण भागात बोलले जाते. यामुळे सुप्रियाताईंबद्दल आपल्या मनात कुठलाही अनादर करण्याचा विचार नाही. जेव्हा-जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा खूपच आदराने आम्ही एकमेकांची चौकशी करतो. काहींनी पराचा कावळा केला; पण सुप्रियाताईंनी माझ्या वक्तव्यावर सकारात्मक प्रतिकिया दिली. हे बोलण्याचा दादांना अधिकार आहे, असे सुप्रियाताई म्हणाल्या; पण विद्या चव्हाण म्हणणार हे स्त्रीद्वेष्टे आहेत. याचा काय संबंध आहे, असे स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिले.

कोणाचाच अनादर करण्याचा माझा स्वभाव नाही

स्वयंपाकाचा विषय काढून टाकू. जर तुम्हाला हे ट्रिपल टेस्ट कळत नसेल, ओबीसी राजकीय आरक्षण मिळत नसेल तर घरी जा, असे आपल्या म्हणण्याचा विषय होता. त्यामुळे सदानंदजी, तुमच्या पत्नीचा किंवा कोणाचाच अनादर करण्याचा माझा स्वभाव नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ज्या ओबीसी समाजाच्या प्रेमापोटी मी हा संताप व्यक्त केला त्या ओबीसी समाजाला आनंद झाला. अजितदादांनी सात्विक संताप व्यक्त केला. जमत नसेल तर घरी जा. त्यामुळे आपल्या वक्तव्याचे एवढे अवडंबर माजवण्याचे कारण नाही, असेही पाटील म्हणाले.

दोन उमेदवार लढवण्याच्या प्रयत्नात कधी-कधी मूळ उमेदवार पडतो हे राऊतांनी लक्षात ठेवावे
कालचक्र फिरत असते. त्यामुळे कोण कोणाला मसणात पाठवेल ते निवडणुकांत कळेल. दोन उमेदवार लढवण्याच्या प्रयत्नात कधीकधी मूळ उमेदवार पडतो हेही राऊत यांनी लक्षात ठेवावे, असा टोला पाटील यांनी शिवसेनेला लगावला. दरम्यान, राज्यसभेची राज्यातील तिसरी जागा लढण्याची केंद्रीय नेतृत्वाने आम्हाला परवानगी दिली तर ती जागा आम्ही जिंकूच, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Share