फोटोवॉर… शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांच्या भेटीचा आणखी एक फोटो व्हायरल

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस यांचीत फोटोवॉर रंगल्याचे दिसून येत आहे. सर्वात आधी मनसेकडून शरद पवार, बृजभूषण सिंह आणि सुप्रिया सुळे यांचा एका कार्यक्रमातला फोटो शेअर करण्यात आला. त्याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एक जुना फोटो ट्वीट करत मनसेला प्रत्युत्तर दिले होते. त्यावरून राजकीय धुरळा अद्याप खाली बसलेला नसताना मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा शरद पवारांचा एक जुना फोटो ट्वीट करत “आता ही बैठक कधी झाली?” असा खोचक सवाल केला आहे.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजपचे उत्तर प्रदेशातील खासदार बृजभूषण सिंह यांनी कडाडून विरोध केला होता. जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची जाहीर माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली होती. त्यामुळे राज ठाकरे यांच्यावर अयोध्या दौरा रद्द करण्याची नामुष्की ओढवली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध होण्यामागे कोणीतरी सापळा रचल्याचा आरोप केला होता.

या पार्श्वभूमीवर मनसेच्या नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते. राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द होण्यात शरद पवार यांचाच हात आहे, असे मनसेकडून सुचित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, बृजभूषण सिंह यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. यावेळी बृजभूषण सिंह यांनी शरद पवार यांच्यासोबत आपले संबंध असल्याची जाहीर कबुली दिली. आजही आमचे संबंध आहेत. मला त्यांना भेटायचे असेल तर आम्ही लपुनछपून भेटणार नाही. ते मला भेटले तर मी त्यांच्या पायाही पडेन. शरद पवार हे देशातील बड्या नेत्यांपैकी एक आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्याकडून काही गोष्टी शिकाव्यात, असा सल्लाही बृजभूषण सिंह यांनी दिला होता.

फोटोंवरून राजकारण तापू लागलेले असतानाच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांचा एक जुना फोटो ट्वीट केला आहे. या फोटोसोबत “आता ही बैठक कधी झाली? आणि अशा किती बैठका झाल्या…सापळा!” अशी कॅप्शन त्यांनी दिली आहे. “आप जैसा कोई मेरे जिंदगी में आये, तो बात बन जाए” असेही त्यांनी या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. या नव्या फोटोमुळे राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरून सुरू झालेले राजकारण आता हळूहळू वेगळ्याच ‘फोटोवॉर’मध्ये रुपांतरीत होऊ लागले आहे.

Share