Rajya Sabha Election 2022: शिवसेनेकडून आमदारांना व्हिप जारी

मुंबई : राज्यसभा निवडणूकीसाठी शिवसेनेकडून आमदारांना व्हिज जारी करण्यात आले आहे. शिवसेना मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हिप जारी केला आहे. पक्षाने दिलेल्या आदेशानुसार मतदान करण्याचे आमदारांना सांगण्यात आले आहे. येत्या १० जून रोजी राज्यसभेसाठी महाराष्ट्र विधान भवनात मतदान होणार आहे. याकरिता विधानभवनातील शिवसेना पक्ष कार्यालयात सकाळी ८ वाजता सर्व आमदारांनी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये, याची खबरदारी शिवसेनेकडून घेतली जात असून कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील सर्व आमदारांची महत्त्वाची बैठक घेतली त्यानंतर आज शिवसेनेतर्फे त्यांच्या आमदारांना व्हिप जारी करण्यात आला आहे.

पक्षादेशात काय लिहिलंय?

राज्यसभा निवडणुकीचे मतदान शुक्रवार दिनांक १० जून २०२२ रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मध्यवर्ती सभागृह, चौथा मजला, विधानभवन, मुंबई येथे घेण्यात येणार आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या विधानसभआ सदस्यांनी मतदानात सहभागी व्हायचे असून सदस्यांनी शुक्रवारी दिनांक १० जून २०२२ रोजी शिवसेना विधीमंडळ पक्ष कार्यालय, दुसरा मजला, कक्ष २१४, विधानभवन, मुंबई या दालनात मतदानाबाबतच्या सूचना घेण्याकरता सकाळी ८ वाजता उपस्थित राहावे. आपल्याला देण्यात येणाऱ्या निर्देश आणि सूचनेप्रमाणे शिवसेना आमदारांनी मतदान पक्षादेशाप्रमाणे करायचे आहे. अत: शिवसेनेच्या विधानसभा सदस्यांना कळवण्यात येते की, सदस्यांनी उपरोक्त दिवशी वेळेवर उपस्थित राहून पक्षाने दिलेल्या आदेशानुसार मतदान करावे, अशा पक्षादेश आहे.

व्हिप म्हणजे काय?

व्हिप हा संबंधित पक्षातील सदस्यांना पक्षाद्वारे दिलेला आदेश असतो याद्वारे आमदारांवर नियंत्रण ठेवलं जातं. विधानसभेत एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावर मतदान करायचं असेलस तर त्याबाबतचा आदेश व्हिपमार्फत जारी करण्यात येतो कार्यकारी विधीमंडळात पक्षातील शिस्त सुनिश्चित करणे हा यामागील हेतू असतो. एखाद्या आमदाराने पक्षादेश धुडकावून लावत मतदान केले तर त्या व्यक्तीचे सभासदत्व धोक्यात येऊ शकते. अथवा तो अपात्र होण्याचा धोका असतो. त्याच्यावर पक्षाची शिस्त भंग केल्या प्रकरणी कारवाई होते, तसेच त्याला पदही गमवावे लागू शकते.

Share