शिवसेनेच्या बंडखोर ३८ आमदारांची सुरक्षा काढली; ठाकरे सरकारच्या निर्णयावर एकनाथ शिंदे संतापले

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेत शिंदे यांच्यासह शिवसेनेतील बंडखोर ३८ आमदारांची सुरक्षा काढून घेतली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांच्यासह राज्यातील सर्व पोलिस आयुक्तांना पत्र लिहून संताप व्यक्त केला आहे. राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या ३८ आमदारांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा काढून घेण्यात आल्याचा आरोप शिंदे यांनी या पत्रात केला आहे.

एकनाथ शिंदे यांनी सेनेच्या ३८ आमदारांची यादी देत या आमदारांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने राजकीय आकसापोटी काढून घेण्यात आल्याचे या पत्रात म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी आपल्या ट्विटर हँडलवरून ३८ आमदारांची यादी असलेले पत्र शेअर केले आहे. हे पत्र त्यांनी गृहमंत्री आणि पोलिस विभागाला पाठवले असून, या पत्रामध्ये आमदारांची सुरक्षा काढून घेण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. शिवसेनेच्या ३८ आमदारांचे संरक्षण काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे, असे एकनाथ शिंदे यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांकडून अशाच पद्धतीने शिवसेनेचे खच्चीकरण करण्यात येत होते व आहे, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.

पत्रात नेमके काय म्हटले आहे?
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री व पोलिस महासंचालकांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, आम्ही विद्यमान आमदार आहोत, तरीही प्रोटोकॉलप्रमाणे आम्हाला आणि आमच्या कुटुंबीयांना दिलेली सुरक्षा बेकायदेशीरपणे काढण्यात आली आहे. हे राजकीय सुडापोटी केले जात आहे. याचा वापर करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गुंडांचा सहभाग असलेल्या महाविकास आघाडीच्या मागण्या मान्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्हाला सुरक्षा देण्याचे कारण आमच्या जीवाला असलेला धोका आहे, आम्ही कोणत्या बाजूचे राजकारण करतो हे नाही. असे असले तरी ज्या धोक्यामुळे आम्हाला महाराष्ट्र सोडावा लागला तेच आता महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या या कृतीने सिद्ध झाले आहे, असा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.

पोलिस सुरक्षा काढून आमच्या आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेशी तडजोड केली जात आहे. सोबतच ‘मविआ’चे नेते आपापल्या पक्षातील कार्यकर्त्यांना आमच्यावर हल्ला करण्यासाठी चिथावणी देत आहेत. याबाबत २३ जूनला माध्यमांमधूनही अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. संजय राऊत यांनी महाराष्ट्र सोडणाऱ्या आमदारांना पुन्हा महाराष्ट्रात येणे आणि महाराष्ट्रात फिरणे अवघड जाईल, असे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यांनंतर आणि आमदारांची सुरक्षा काढल्यानंतर काही वेळातच आमच्या दोन सदस्यांच्या कार्यालयांची तोडफोड करण्यात आली आहे. महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा काढून घेण्याचा असा प्रकार पंजाबमध्येही झाला होता. त्यानंतर तेथे या व्यक्तींना गुंडांनी लक्ष्य केल्याचे समोर आले. महाराष्ट्रात आमदारांची सुरक्षा काढण्याचे असेच परिणाम होतील, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

प्रोटोकॉलप्रमाणे आम्हाला व आमच्या कुटुंबीयांना जी सुरक्षा द्यायला हवी ती तात्काळ द्यावी, अशी मागणीही एकनाथ शिंदे गटातील ३८ आमदारांनी केली आहे. तसेच आमच्या कुटुंबीयांना कोणतीही इजा झाली तर त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत, आदित्य ठाकरे तसेच महाविकास आघाडीचे नेते जबाबदार राहतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

सध्या एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा मुक्काम आसाममधील गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये आहे. या हॉटेलमध्ये शिवसेनेचे ४० आणि १० अपक्ष आमदार असल्याची माहिती आहे. आसाम सरकारकडून या सर्वांच्या सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या आमदारांच्या सुरक्षिततेसाठी रॅडिसन ब्लू हॉटेलबाहेर स्थानिक पोलिस आणि केंद्रीय पोलिस दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. गुवाहाटीतील सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही कमतरता नाही. मात्र, एकनाथ शिंदे यांचा आरोप पाहता या आमदारांच्या महाराष्ट्रात राहत असलेल्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

एकनाथ शिंदे स्वत:ला वाघ म्हणवतात, मग त्यांनी बकरीसारखे वागू नये : संजय राऊत

दरम्यान, शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. एकनाथ शिंदे असे कसे काय म्हणू शकतात? ते महाराष्ट्राच्याबाहेर आहेत. त्यांनी गुवाहाटीला पलायन केले आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत स्वत:चे सुरक्षारक्षक नेले आहेत. त्यांना जी सुरक्षा आहे ती आमदार म्हणून आहे. त्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारची सुरक्षा नसते. तुम्ही असे वणवण भिकाऱ्यासारखे का भटकत आहात. राज्यात परत या, या महाराष्ट्राची इभ्रत धुळीला मिळवू नका. एकनाथ शिंदे स्वत:ला वाघ म्हणवतात, मग त्यांनी बकरीसारखे वागू नये, असा टोला खा. संजय राऊत यांनी लगावला आहे.

Share