ब्रेडच्या दरात झाली वाढ; ब्रेकफास्ट महागणार

मुंबई : खाद्यतेल, पेट्रोल-डिझेल, गॅससारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीनंतर आता ब्रेडच्या दरातही वाढ झाली आहे. स्लाईस ब्रेडच्या दरात प्रति वडी २ ते ५ रुपयांनी वाढ झाली असून, पाच महिन्यांत दुसऱ्यांदा स्लाईस ब्रेडच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांचा नाश्ताही महागणार आहे.

मॉडर्न, ब्रिटानिया आणि विब्स या तीन प्रमुख ब्रँड्सनी गेल्या आठवड्यात ब्रेडचे दर वाढवले आहेत. ब्रेडच्या नव्या दरवाढीनुसार ३५० ते ४०० ग्रॅम पांढऱ्या ब्रेडची किंमत ३३ रुपयांवरून ३५ रुपये झाली आहे, तर सॅंडवीचसाठी स्टॉलवर वापरल्या जाणाऱ्या ८०० ग्रॅम ब्रेड (विब्स लोफ) ची किंमत ६५ रुपयांवरून ७० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. मल्टि-ग्रेन ब्रेडचा नियमित लोफ ५५ रुपयांवरून ६० रुपये झाला आहे. ब्राऊन ब्रेडची किंमत ४५ रुपयांवरुन ५० रुपये झाली आहे. ब्रेडच्या या दरवाढीमुळे सँडविचच्या दरही वाढण्याची शक्यता आहे.

नुकतीच जानेवारी २०२२ मध्ये ब्रेडच्या दरात ३-५ रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यामुळे एकापाठोपाठ दोनदा दर वाढल्यामुळे डिसेंबर २०२१ च्या तुलनेत एका पावाची किंमत ५-१० रुपयांनी वाढली आहे. केंद्र सरकारच्या फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय) ने यावर्षी गव्हासाठी खुल्या बाजार विक्री योजना जाहीर न केल्यामुळे ही किंमत मे महिन्यापासूनच अपेक्षित होती. पीठ, ब्रेड आणि बिस्किटे यांसारख्या गव्हावर आधारित उत्पादनांच्या उत्पादकांनी जूनपासून तुटवडा निर्माण होण्याचा आणि किंमती वाढण्याचा इशारा दिला होता. आधीच महागाई वाढत असताना आता ब्रेडच्या दरात वाढ झाल्यामुळे पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

Share