विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकरांविरुद्ध शिवसेनेचे राजन साळवी निवडणूक रिंगणात

मुंबई : महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार आल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून आमदार राहुल नार्वेकर, तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी आता राहुल नार्वेकर विरुद्ध राजन साळवी अशी थेट लढत होणार आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील आणि नाराज अपक्ष आमदारांना सोबत घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागले. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर ३० जूनला बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने नवे सरकार स्थापन केले. ३० जूनलाच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. त्यानुसार विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनातच ३ जुलै रोजी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार असून, ४ जुलैला विश्वासदर्शक ठराव मांडण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. पक्षातील आमदारांनीच घात केल्यामुळे उद्धव ठाकरे दुखावले गेले असून, त्यांनी बंडखोर शिंदे गटाला धक्का देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध न होऊ देता शिवसेनेने राजन साळवी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपने अनेक ज्येष्ठ आमदारांचा पत्ता कट करत मुंबईतील आमदार राहुल नार्वेकर यांना संधी दिली आहे. नार्वेकर यांनी कालच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, महाविकास आघाडीकडून शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार ठरलेला नव्हता. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा अर्धा तास उरला असताना महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीत अखेर राजन साळवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. आज शनिवारी साळवी यांनी आपला अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे सुनील प्रभू हे उपस्थित होते.

महाविकास आघाडी सरकार असताना नाना पटोले हे विधानसभा अध्यक्ष होते. मात्र, त्यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळताच जानेवारी २०२१ मध्ये त्यांनी विधानसभा अध्यपदाचा राजीनामा दिल्यामुळे तेव्हापासून हे पद रिक्त आहे. तेव्हापासून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हेच अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडत होते. आता शिंदे सरकारची बहुमत चाचणी दोन दिवसाच्या विशेष अधिवेशनात होणार आहे. त्याआधी उद्या विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. बहुमत चाचणीच्या वेळी विधानसभा अध्यक्षांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. आम्हाला १७० पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. असे असतानाही महाविकास आघाडीने पुन्हा एकदा आपली प्रतिष्ठा पणाला लावत विधानसभा अध्यक्षापदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोण आहेत राहुल नार्वेकर?
भाजपकडून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लढवत असलेले राहुल नार्वेकर हे आधी शिवसेनेत होते. शिवसेनेचे प्रवक्तेपद सांभाळणारे नार्वेकर आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जात असत; परंतु २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ते तीन वर्षे राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य होते. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २०१९ च्या निवडणुकीत ते भाजपच्या तिकिटावर मुंबईतील कुलाबा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. राहुल नार्वेकर हे विधान परिषदेचे सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर यांचे जावई आहेत.

कोण आहेत राजन साळवी?
राजन साळवी हे शिवसेनेचे उपनेते असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आहेत. ते रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार आहेत. २००९ पासून सलग तीन वेळा ते राजापूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. शिवसेनेचे अनेक आमदार शिंदे गटात गेले असताना राजन साळवी हे निष्ठावान म्हणून शिवसेनेतच राहिले. त्यामुळेच शिवसेना नेतृत्वाने त्यांना विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दिल्याचे बोलले जात आहे.

Share