पुणे : पंजाबी गायक आणि कॉँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील फरार आरोपी संतोष सुनील जाधव (वय २० वर्षे, रा. पोखरी, ता. आंबेगाव, सध्या रा.मंचर) याला अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी गुजरात राज्यातील कच्छ येथे अटक केली आहे. संतोष जाधव हा सराईत गुन्हेगार व शार्प शूटर असून, संतोष जाधवला आश्रय देणारा त्याचा साथीदार नवनाथ सुरेश सूर्यवंशी (वय २८ वर्षे, रा. विखळे, ता. खटाव, जि. सातारा, ह. मु. कच्छ, जि. भुज, गुजरात) यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणात या दोघांची नावे पुढे आली होती. अखेर पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला या दोघांना जेरबंद करण्यात यश आले आहे. संतोष जाधव आणि नवनाथ सूर्यवंशी यांना रविवारी अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. काल रात्री बारा वाजता या दोन आरोपींना पुण्यातील न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले असता त्यांना २० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
लाॅरेन्स बिष्णोई टोळीशी संबंध
पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील जवाहरके या गावात २९ मे रोजी पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मुसेवाला खून प्रकरणात पंजाब, राजस्थानमधील कुख्यात गँगस्टर लाॅरेन्स बिष्णोई टोळीचा हात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते. मुसेवालावर गोळ्या झाडणाऱ्या दहा हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली आहेत. मुसेवाला हत्या प्रकरणात पुणे जिल्ह्यातील मंचरमधील गुंड संतोष जाधव आणि त्याचा साथीदार सौरभ महाकाळ संशयित आरोपी आहेत. यापैकी सौरभ महाकाळला काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी अटक केली असून आता संतोष जाधवलाही अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. मुसेवाला प्रकरणात पुणे पोलिसांनी आतापर्यंत अटक केलेल्यांची संख्या पाचवर पोहोचली आहे.
सलमान खान धमकी प्रकरणात संतोष जाधवची होणार चौकशी
दरम्यान, गेल्या आठवड्यात संतोष जाधवला आश्रय दिल्याच्या आरोपावरून पुणे ग्रामीण पोलिसांनी सिद्धेश कांबळे ऊर्फ सौरभ महाकाळ (रा. नारायणगाव, ता. जुन्नर) याला अटक केली आहे. संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ यांनी गेल्या वर्षी आंबेगाव तालुक्यात ओंकार ऊर्फ राण्या बाणखेले याची पूर्ववैमनस्यातून गोळ्या झाडून हत्या केली होती. तेव्हापासून हे दोघेजण पसार होते. जाधव आणि महाकाळ पंजाब, राजस्थानात पसार झाले होते. राजस्थानात खंडणीसाठी एका व्यावसायिकावर गोळीबार केल्याप्रकरणी संतोष जाधवला अटक करण्यात आली होती. राजस्थानातील कारागृहात तो लाॅरेन्स बिष्णोई टोळीच्या संपर्कात आल्याची माहिती समोर आली आहे.
याच बिष्णोई टोळीने बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील प्रसिद्ध पटकथालेखक सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र पाठवल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे पत्र सिद्धेश कांबळे ऊर्फ सौरभ महाकाळच्या माध्यमातून पाठवण्यात आले आहे का? या पत्राशी महाकाळचा काही संबंध आहे का यासंदर्भात काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती. आता शार्पशूटर संतोष जाधवचीही अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकी दिल्याच्या प्रकरणातदेखील चौकशी होणार आहे.
सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित तसेच ‘मोक्का’ कारवाईनंतर पसार झालेला संशयित आरोपी सिद्धेश कांबळे ऊर्फ सौरभ महाकाळ हा पुणे जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक डाॅ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके आणि पथकाने महाकाळला अटक केली. महाकाळला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २० जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.