पूजा हेगडेसोबत विमानात गैरवर्तणूक; पूजाने ट्विट करून व्यक्त केला संताप

मुंबई : बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडे इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाने प्रवास करीत असताना पूजाबरोबर धक्कादायक प्रकार घडला आहे. विमानातल्या एका कर्मचाऱ्याने पूजाशी गैरवर्तणूक केली. तिला धमकीही दिली. पूजाने ट्विट करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली आहे.

पूजा हेगडे ही बॉलिवूड आणि टॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. पूजा सध्या तिच्या चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. कामानिमित्त पूजा जगभरात प्रवास करत असते. गुरुवारी (९ जून) रोजी पूजा इंडिगो एअरलाइन्सच्या IndiGo6E या विमानाने मुंबईहून दुसऱ्या ठिकाणी जात होती. या विमान प्रवासादरम्यान इंडिगो एअरलाइन्सच्या एका कर्मचाऱ्याने पूजाला चुकीची वागणूक दिली. हा सगळा घडलेला प्रकार पूजाने सोशल मीडियावर ट्विट करत सांगितला आहे. पूजा हेगडेने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘मला खूपच दु:ख होत आहे की, ‘इंडिगो’चा कर्मचारी विपुल नकाशेने मुंबई फ्लाइटमध्ये माझ्याशी अत्यंत वाईट वर्तणूक केली. कारण नसताना तो माझ्यासोबत उद्धट वागला. तो आमच्याशी विनाकारण उद्धट आणि धमकीच्या स्वरात बोलत होता. मला धमकी दिली. मी अशा प्रकारचे ट्विट कधीच करत नाही; पण आमच्याबरोबर घडलेली ही घटना खरंच खूप भयानक आहे.’

 

इंडिगो एअरलाइन्स कंपनीने मागितली माफी
पूजा हेगडेने या ट्विटची इंडिगो एअरलाइन्स कंपनीने लगेच दखल घेतली. माफी मागत त्यांनी खेद व्यक्त केला आणि डिटेल्स शेअर करण्याची विनंती केली. म्हणजे पूर्ण घटनेची ते माहिती घेऊ शकतील. पूजा हेगडेचे हे ट्विट चांगलेच चर्चेत आहे. तिच्या या ट्विटवर अनेक लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. इंडिगो स्टाफ मेंबर विपुल संबंधित जुन्या ट्विटलाही काहींनी शेअर केले आहे. पूर्वीही तो अशीच गैरवर्तणूक करत असे, असे काहींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

पूजा हेगडेने ह्रतिक रोशनसोबत ‘मोहेंजोदारो’ या चित्रपटातून बॉलिवूडमधे पदार्पण केले होते. नुकताच कान्स फेस्टिव्हलमध्ये तिने आपला जलवा दाखवला होता. पूजा हेगडे प्रभासच्या ‘राधे श्याम’ आणि विजयसोबत ‘बीस्ट’ सिनेमात झळकली होती; पण हे चित्रपट फारसे चालले नाहीत. लवकरच ती रणवीर सिंगबरोबर ‘सर्कस’ आणि सलमान खानच्या ‘कभी ईद, कभी दिवाली’ या चित्रपटातून प्रेक्षकांपुढे येणार आहे. तसेच तिला न गण मन’ हा सिनेमाही मिळाला आहे.

Share